सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिशन असलेली हरघर नल अंतर्गत जलजीवन मिशन योजनेतून अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथे मंजूर झालेल्या जलजीवन योजनेतील कामाला भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी व झेडपीचे माजी पक्षनेते आनंदा तानवडे यांच्या गटातील विरोधामुळे योजना रखडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन मिशनमधून सोलापूर जिल्ह्यासाठी 900 कोटीची योजना मंजूर झाली आहे. या योजनेतील कामांना गती मिळाली आहे. पण अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथील काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हे काम घेतलेल्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची नोटीस बजावण्याचे काम हाती घेतले आहे. पण वास्तविक हे काम गावातील दोन गटाच्या अंतर्गत वादामुळे रखडल्याचे दिसून आले आहे. ग्रामपंचायतने दिलेल्या ठरावानुसार हे काम करावे म्हणून झेडपी प्रशासनाने सूचना दिल्यावर ठेकेदाराने काम सुरू केले. ही हालचाल दिसून आल्यावर माजी पक्षनेते आनंद तानवडे यांनी सोमवारी आपल्या कार्यकर्त्यांसह पाणीपुरवठा विभागात ठिय्या मारला होता. जुन्या जागेत पाण्याची टाकी उभी करायला या गटाचा विरोध आहे. जुन्या जागेत एका शेतकऱ्याने बक्षीसपत्र देऊन पाण्याची टाकी उभारली होती. पण या ठिकाणी पाण्याची चोरी होत असल्याचे या गटाचे म्हणणे आहे. गावठाणात इतर ठिकाणी भरपूर जागा आहेत, त्यामुळे इतर ठिकाणी कोठेही ही योजना राबवा असे त्यांचे म्हणणे आहे. पण ग्रामपंचायतीने यापूर्वीच यावर ग्रामसभा घेऊन त्याच जागी ही योजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वादात हे काम रखडले आहे. त्याच जागेत योजना केल्यास आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा तानवडे गटाने दिला आहे. ग्रामपंचायतीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे प्रस्थ असल्याने प्रशासनावर दबाव असल्याचा आरोप होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेला भाजपच्या गटातील अंतर्गत वादामुळे विरोध होत असल्याने जलजीवन यशस्वी होणार का? असा आता सवाल उपस्थित झाला आहे. जागेच्या वादातून लटकलेल्या जिल्ह्यातील जलजीवनच्या अनेक योजना आता रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. टंचाई स्थितीत पाण्याची झळ सोसलेल्या गावांना मात्र या योजनेचा मोठा फायदा झाला आहे.
मंजूर झालेले काम वेळेत होणे अपेक्षित आहे. परंतु ज्या बक्षीसपत्र जागेवर काम करायचे आहे, त्याला काहींनी विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जागेची तपासणी करून अभिप्राय द्यावा, असे अक्कलकोट पंचायत समितीला कळविले आहे.
सुनील कटकधोंड,
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा