सोलापूर अक्कलकोट पंचायत समितीमधील 31 कर्मचारी निवृत्त झाल्यामुळे शुक्रवारी त्यांचा पेन्शन, ग्रॅच्युइटी व पेन्शन विक्रीचा आदेश देऊन सन्मान करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून 31 मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी शिक्षक कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी सेवानिवृत्त आदेश देण्याचा संकल्प केला होता. याा निमित्ताने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदी सेवा निवृत्ती दिन साजरा करण्याच्या विभाग प्रमुखांना त्यांनी सूचना केल्या होत्या. अक्कलकोट तालुक्यांत दि. 31 मे रोजी सेवानिवृत्त होणारे विस्तार अधिकारी कृष: 1, विस्तार अधिकारी शिक्षण: 2, आरोग्य सेविका: 1, परिचर: 1, मुख्याध्यापक/शिक्षक: 26 अशा एकूण 31 कर्मचाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्याहस्ते सेवानिवृत्तीच्या दिवशीच सेवानिवृत्ती आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी मीनाक्षी वाकडे यांनी मनोगत व्यक्त करताना माझे वडील सरकारी कर्मचारी होते. त्यांना सेवानिवृत्ती दिवशीच त्यांना सेवानिवृत्ती आदेश मिळाला होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी त्यावेळी पाहिला होता. तोच आनंद आज तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर मी बघत आहे. आपण केलेल्या चांगल्या कामाची ही पावती आहे. सेवानिवृत्ती आदेश आज मी देऊ शकले त्याचा मला आनंद मनस्वी आनंद आहे. कनिष्ठ प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक यांनी पुढाकार घेऊन सेवानिवृत्ती प्रकरणाचा निपटारा केलेला आहे. याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करते. यापुढेही सेवानिवृत्ती दिवशीच आदेश देण्याचा माझा संकल्प राहील. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना अक्कलकोट तालुक्यातील अधिकारी, सर्व कर्मचारी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केल्यामुळेच आज जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमताच एवढ्या मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्तीच्या दिवशीच सेवानिवृत्ती आदेश देऊन सीईओ आव्हाळे यांनी केलेला संकल्प आपण सर्वांनी पूर्ण केलेला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी केले. आभार गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांनी मानले. यावेळी सुभाष फुलारी, अभिजीत सुरडीकर, वीरभद्र यादवाड, शंकर आजगोंडा, मुर्डी आळीगिड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, स्मिता पाटील, मीनाक्षी वाकडे यांचे आभार मानले. तसेच 31 कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती दिवशीच लाभ मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम करणारे प्रशासनाधिकारी दयानंद परिचारक यांचा सर्व संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दोडमनी, कवडे, गायकवाड, कोळी, पाटील, पठाण कोरे,मठ,बोरगाव, चव्हाण, निकम, बिराजदार, राठोड, दामटे, कनाळ, अंजूटगी व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
281 कर्मचारी निवृत्त…
जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील 281 कर्मचारी निवृत्त झाले. पण आचारसंहितेमुळे मुख्यालयात कार्यक्रम झाला नाही. आरोग्य व शिक्षण विभागातील कर्मचारी निवृत्तीच्या कार्यक्रमात भावुक झाले.