सोलापूर : हिंदूंचे संघटन हाच देशातील सर्व समस्यांवर उपाय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी शनिवारी झालेल्या प्रांत संघ शिक्षा वर्ग समारोप समारंभात केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र संघ शिक्षा वर्गाचा समारोप रविवारी सायंकाळी ह. दे. प्रशालेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात झाला.
१७ मे ते १ जून दरम्यान रा. स्व संघाचा सोलापूरसह, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या सात जिल्ह्यांसाठीचा पश्चिम महाराष्ट्र निवासी संघ शिक्षा वर्ग झाला. या वर्गाच्या समारोपाप्रसंगी प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वामसी लॅब लिमिटेडचे सी.एम.केशवा रेड्डी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर वर्गाचे सर्वाधिकारी रवींद्र वंजारवाडकर, वर्गकार्यवाह राहुल पुंडे, वर्गपालक दीपक काळे, सोलापूर शहराचे शहर संघचालक राजेंद्रसा काटवे उपस्थित होते. प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर संघ प्रार्थना झाली. तसेच संघाच्या संचलनातील ‘प्रत्युत् प्रचलनम् ‘ चे प्रात्यक्षिक करण्यात आले. यानंतर ‘प्रदक्षिणा संचलनम् ‘ करत रा. स्व. संघाच्या गुरुस्थानी असलेल्या परमपवित्र भगव्या ध्वजास संचलनाद्वारे प्रदक्षिणा घालण्यात आली. यानंतर १५ दिवसीय संघ शिक्षा वर्गात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना देण्यात आलेल्या घोषवादन, पदविन्यास, दंड युद्ध, नियुद्ध, योगासन, सामूहिक पद्यगायन या दिलेल्या प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी सादर केलेल्या या प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी दाद दिली. यानंतर “तप निरंतर चल रहा है,संघ बढता जा रहा है” हे वैयक्तिक गीत सादर करण्यात आले.
यावेळी रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव म्हणाले, देशाचे प्रश्न किंवा समस्या सांगण्यापेक्षा समस्या सोडवणारा समाज व्हावा अशी संघाची भूमिका आहे. संघाच्या वर्गातून सहजीवन, सहकाराचा संस्कार होतो. संघवर्ग म्हणजे पक्के देशभक्त तयार करण्याची भट्टी आहे. ज्यात तयार झालेले स्वयंसेवक न सांगता देशकर्तव्य पार पाडतात. देशासमोर सध्या वैचारिक, आर्थिक व सामाजिक आव्हाने असल्याचा देखील उल्लेख नानासाहेब जाधव यांनी केला. यावेळी एम. केशवा रेड्डी म्हणाले, रा. स्व. संघ ही देशासाठी निस्वार्थपणे काम करणारी संघटना आहे. गेली ९८ वर्षे संघावर टीका झाली परंतु संघ निरंतर कार्यरत राहिला. आता संघ आणखी वाढत आहे. मजबूत पायाच्या आधारावर संघ देशभक्तांची तयार करत आहे.
संघ प्रशिक्षण शिबिराचे कार्यवाह राहुलजी पुंडे यांनी प्रास्ताविक करताना सहभागी स्वयंसेवक व शिबिराची माहिती उपस्थितांना विस्तृतपणे दिली.वर्ग कार्यवाह राहुलजी पुंडे यांनी आभार प्रदर्शन केले. ध्वजावतरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.या कार्यक्रमास सोलापूरसह, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गात ग्रामीण भागातून १०० तर शहरी भागातून २५७ स्वयंसेवक सहभागी झाले होते.रा.स्व. संघाच्या २७२ शाखामधून हे स्वयंसेवक सहभागी झाले होते.यापैकी १०० शिक्षार्थी हे १० व १२ वी परीक्षा देऊन सहभागी झाले होते.त्यांनी वर्गातूनच आपला निकाल जाणून घेतला. प्रशिक्षण कालावधीत १७ दिवस स्वयंसेवकांना भ्रमणध्वनीपासून दूर ठेवण्यात आले होते.
या प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी ओला व सुका कचऱ्यापासून जवळपास १००० पेक्षा जास्त इकोब्रिक्स तयार केले होते. स्वयंसेवकांनी तयार करण्यात आलेल्या या इको ब्रिक्स महापालिका प्रशासनास भेट देऊन त्याची माहिती देण्यात येणार आहे.याबरोबरच ३ हजारपेक्षा जास्त सीडबॉल्स तयार करण्यात आले.
सामूहिक बुद्ध वंदना
प्रशिक्षण वर्गात संपूर्ण मानवजातीला *जगा आणि जगू द्या* असा विश्वशांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस येत असल्याने वैशाख ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सामूहिक बुद्धवंदना आयोजित करण्यात आली . शिक्षार्थ्यांनी तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुहिकरीत्या बुद्धवंदना म्हटली .यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक श्री. बाबा बाबरे (संस्थापक अध्यक्ष भिम प्रतिष्ठान सोलापूर) व भंते दीपंकरजी, भंते सुमेधजी, संघ प्रशिक्षण वर्गाचे मा.सर्वाधिकारी रविंद्रजी वंजारवाडकर , वर्ग कार्यवाह राहुलजी पुंडे, दिपकराव काळे उपस्थित होते.