सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना एकूण ६२०२२५ इतकी मते मिळाली तर भाजपचे राम सातपुतेंना ५४६०२८ मते मिळाली.
यात प्रणिती शिंदें यांचा ७४१९७ इतक्या मताधिक्यांने विजय झाला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर लोकसभेच्या नूतन पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले. आमदार शिंदे यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला होता. तसेच त्यांच्या मातोश्री उज्वला शिंदे यांनाही एकदा पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रणिती शिंदे यांनी सलग तीन वेळा आमदाराच्या विजयाची हॅट्रिक केली आणि आता चौथ्या वेळेस त्या खासदार झाल्या आहेत. आई-वडिलांच्या पराभवाचा वचपा त्यांनी काढला आहे. हा आनंद त्यांनी कुटुंबीयांसमवेत भर पावसात साजरा केला.