सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रिया संपली तरी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सोलापूरकरांना दर्शन दुर्मिळ झाले आहे. पालकमंत्री पाटील यांनी बैठका न घेतल्याने पावसाळी नियोजनाचा खोळंबा झाला आहे.
सोलापूरकरांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसले होते. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी माढा लोकसभा उमेदवाराबाबत केलेले भाकीत खरे ठरले. नुसता माढाच नव्हे तर सोलापूर लोकसभेचीही जागा भाजपच्या ताब्यातून गेली. भाजप आमदार, पदाधिकाऱ्यांना हा पराभव जिव्हारी लागला आहे. पराभवाचे आत्मचिंतन व खचलेल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर दौरा करणे अपेक्षित होते. त्याचबरोबर उन्हाळा संपून पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीचे नियोजन तोंडावर आहे. पावसाने जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली आहे. पिण्याच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे तर पाऊस थांबल्यावर खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू होणार आहे. रासायनिक खते व बियाणांचे नियोजन आणि शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीयकृत बँका वेगवेगळी नियमावली लावून शेतकऱ्यांची कर्जासाठी अडवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाणे खरेदी करण्यासाठी पैशाची नितांत गरज असताना वेळेवर पतपुरवठा होताना दिसून येत नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष घालून बँकांना तंबी देणे गरजेचे झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्याची विकास कामे सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन व इतर बैठका तातडीने घेणे आवश्यक झाले आहे. जोरदार पावसामुळे महापालिकास्तरावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महापालिका प्रशासनाला वेळेत सूचना देणे गरजेचे आहे. पालकांमध्ये शाळा प्रवेशाची धावपळ सुरू आहे. महसूल प्रशासन लोकसभा निवडणुकीतून निवांत झाल्यावर बरेच अधिकारी रजेवर असल्याने अनेक तहसीलकडे दाखले प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. याबाबत संबंधितांना सूचना देणे गरजेचे झाले आहे. महापालिका व जिल्हा परिषदेवर प्रशासकराज सुरू असल्याने विकासकामे गतीने होण्यासाठी बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे. अशा स्थितीत पालकमंत्र्यांनी तातडीने सोलापूरचा दौरा करून प्रशासनाला कामाला लावणे महत्वाचे झाले आहे. पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सोलापूरविषयी अनास्था कायम दिसून येत आहे. निवडणुका येतील- जातील, पण लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. लोकसभेचा पराभव विसरून नव्या जोमाने सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.