सोलापूर : शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टल वर निवड झालेल्या 38 विषय शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अपात्र ठरविल्याने टेन्शनमध्ये आलेल्या शिक्षकांना प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी दिलासा दिला.
शासनाने राज्यभर नव्याने निवड झालेल्या शिक्षकांची यादी पवित्र पोर्टलवर टाकली आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे 248 शिक्षकांची निवड यादी आली आहे या शिक्षकांपैकी 38 विषय शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाने अपात्रतेची नोटीस दिली आहे. राज्यभरातील जिल्हा परिषदेने विषय शिक्षकांची नियुक्ती केलेली असताना सोलापूर जिल्हा परिषदेने मात्र अन्याय केल्याची तक्रार या शिक्षकांनी केली. 21 जून रोजी होणाऱ्या शिक्षक समायोजनात आम्हालाही नियुक्त्या मिळाव्यात अशी मागणी या शिक्षकांनी सोमवारी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांना भेटून केली. पण शिक्षणाधिकारी शेख यांनी म्हणणे ऐकून न घेताच पिठाळून लावले अशी कैफियत घेऊन हे सर्व शिक्षक जिल्हा परिषदेत आले. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यावेळी जिल्हा परिषदेत नसल्यामुळे हे सर्व शिक्षक उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांच्या दालनासमोर जमले व त्यांनी गोंधळ सुरू केला. पाटील यांनी लागलेल्या शिक्षकांना कार्यालयात बोलावून त्यांची कैफियत ऐकून घेतली. त्यानंतर शिक्षण विभागाच्या अधीक्षक होळकर यांना संपर्क साधून त्या शिक्षकांना न्याय देण्याविषयी सूचना केली त्यावर होळकर यांनी या शिक्षकासंबंधी शासनाकडून मार्गदर्शन मागविल्याचे सांगितले ते पत्र या शिक्षकांना देण्याविषयी पाटील यांनी सूचना केली. शासनाचा याबाबत मार्गदर्शन आल्यावर तुम्हाला सेवेत घेतले जाणारच आहे असे आश्वासन दिल्यावर चिंतेत असलेले ते सर्व शिक्षक आल्या पावली परतले. यात बहुसंख्य महिला होत्या व त्यांचे पालक सोबत आले होते काहींची लहान मुले होती तीही रडत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डेप्युटी सीईओ पाटील यांनी सर्वांचे समजूत काढल्यावर वातावरण शांत झाले.
सोमवारपासून प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी संजय जाविर यांच्यासह प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी समुपदेशाने प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या कामात व्यस्त झाले आहेत या गोंधळातच हे शिक्षक आल्यामुळे समस्येत भर पडली आहे. शासनाने नव्याने भरती प्रक्रियेतून पवित्र पोर्टलद्वारे मराठी माध्यमसाठी 223, कन्नडसाठी 10 व उर्दूसाठी 15 असे एकूण 248 शिक्षक जिल्हा परिषदेकडे पाठविले आहेत. विषय शिक्षकांच्या बाबतीत जिल्हा परिषदेने मुद्दा उपस्थित केला आहे. आमची शासनाने निवड केली असताना शिक्षणाधिकारी शेख हा मुद्दा विनाकारण उपस्थित करीत आहेत, असा आरोप अन्यायग्रस्तांचे नेतृत्व करणाऱ्या मगर यांनी केला आहे. याबाबत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडेही तक्रार केल्याचे ते म्हणाले. शासनाचे एकदा मार्गदर्शन येऊ द्या मग निर्णय होईल असे डेप्युटी सीईओ पाटील यांनी समजावून सांगताच त्या शिक्षकांना हायसे वाटले.