सोलापूर : आपल्या कामातून धडाका देणाऱ्या सोलापूर lच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या पंढरपूर गाव भेटीदरम्यान कासेगावात पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक हे दोन हजार रुपये घेऊन नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करत असल्याबाबतची तक्रार करण्यात आल्यानंतर खासदार शिंदे यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना बोलवून झाडाझडती घेतली तर दुसरीकडे बार्शी तहसील कार्यालयात रेशन कार्ड साठी दीड हजाराची लाच घेताना डाटा ऑपरेटरला रंगेहात पकडण्यात आले आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यात कासेगाव येथे अनेक नागरिकांनी पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक रेशन कार्ड देण्यासाठी पैशाची मागणी करतात अशी तक्रार केली. विशेष म्हणजे जिल्हा रेशन दुकानदार संघटनेने याबाबत तहसीलदार व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार दिल्या होत्या. पण संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदार सोडून भलत्यांचेच म्हणणे घेऊन चौकशी गुंडाळली होती. पण मंगळवारी प्रत्यक्ष खासदारांच्या गावभेठी दरम्यान या तक्रारी पुराव्यासहित समोर आल्या. यावर खासदार शिंदे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांना संपर्क साधून पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्या कारभाराबाबत नापसंती व्यक्त केली. त्यांना जनता दरबारात बोलावून चांगलीच खरडपट्टी केली आहे. त्यामुळे नाईक यांच्यावर आता पुरवठा विभाग कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरवठा निरीक्षक हे दुकानदारावर नियंत्रण ठेवण्याकरिता व ग्राहकांच्या मूलभूत सुविधा असणाऱ्या शिधा पत्रिका व गरजू नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ठ करण्याची जबाबदारी असते. पण प्रत्यक्षात मात्र पंढरपुरातील पुरवठा निरीक्षक हे ग्राहकाकडून तब्बल दोन हजार रुपये घेऊन अन्नसुरक्षा यादीत नाव समाविष्ट करून घेत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांच्याविरुद्ध लेखी तक्रार देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली नाही. प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकातून व्यक्त होत आहे. आणि ह्याच जाचक त्रासाला कंटाळून आज कासेगाव ग्रामस्थानी पुरवठा निरीक्षक यांच्या तक्रारीचा खासदार समोरच पाढा वाचला, खासदार प्रणिती शिंदे ह्या पंढरपुरातील कासेगाव ह्या ठिकाणी नागरिकांचे अडीअडचणी जाणून घेण्यासाठी केले असता तिथे हा सर्व प्रकार निदर्शनास आला. तब्बल दोन तास मीटिंगमध्ये दीड तास हा पुरवठा विषयक तक्रारी वर खासदारानी पुरवठा निरीक्षक यांची चांगलीच कान उघडणी केली. लोकप्रतिनिधीच्या तंबीनंतर नाईक यांचा चेहरा पाहण्यालायक झाला होता
दीड हजाराची लाच घेतली
पिवळ्या रेशन कार्डवर धान्य सुरू करण्यासाठी पंधराशे रुपयाची लाच घेताना बार्शी तहसील कार्यालयातील डाटा एन्ट्री ऑपरेटरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. वर्षा भगवान काळे ( रा. मु.पो. कांदलगांव रोड, सायली हॉटेल शेजारी बार्शी) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांना पिवळ्या रेशनकार्डवर धान्य मिळत नसल्याने बार्शी तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखा येथील डाटा एंट्री ऑपरेटर वर्षा काळे यांना भेटून लेखी अर्ज १४ जून रोजी केला होता. यावेळी डाटा एन्ट्री ऑपरेटर काळे यांनी अर्ज न स्विकारता तक्रारदार यांना १५०० रुपये लाचेची मागणी केली व अर्जासह १८ जून रोजी बोलावले होते. त्यानुसार तक्रारदाराने अँटी करप्शन कडे तक्रार केली. अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी ऑपरेटर वर्षा काळे यांनी पडताळणी केले व त्यानंतर लाच घेताना काळे हिला रंगेहाथ पकडले. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाणे पेथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.