सोलापूर : कर्नाटक सीमावृत्तीय प्रांतात म्हणजेच अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा तालुक्याच्या काही भागात शुक्रवारी कर्नाटकी बेंदूर अर्थात ‘कारहुनवी” हा बैलांचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दक्षिण सोलापुरातील मंद्रूप येथे बैल जोड्यांच्यासमोर घोडे नाचवण्याची नवीन परंपरा सुरू झाली आहे.
मंद्रूप येथे ‘कारहुनवी” ची पूर्वीपासून वेगवेगळी परंपरा आहे. दरवर्षी पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आदल्या दिवशी बैलांना धुवून लोणी व हळद लावून बैलांचे खांदे चोळले जातात याला ‘खांदमळणी” असे म्हटले जाते. या सणानंतर खरीप पेरणीला सुरुवात होते. त्यामुळे बैलांचे खांदे मजबूत राहण्यासाठी ही परंपरा चालत आल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे. त्यानंतर वटपौर्णिमेदिवशी सकाळी पुन्हा बैलांना धुवून अंगावर पिवळी व सिंगांना वार्निश लावून सुती नायलॉन व रेशमी दोरखंडाद्वारे सजवले जाते. सकाळी बैलांना शेतातून घराकडे आणताना वेशीतून मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुकीचा मान देशमुख यांच्या बैल जोडीला आहे. त्यानंतर गावातील इतर मंडळी आपली बैलजोडी घेऊन येतात. त्यानंतर दुपारी घरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलांसह इतर जनावरांची सुवासिनीकडून बैलांची पूजा केली जाते. यावेळी घरातील प्रमुख शेतकरी खांद्यावर घोंगड, त्यावर अवताच्या फाशीला लटकावून पाबरीचे तोंड घेतले जाते. तो शेतकरी पुढे चालत राहतो, मागे त्याची पत्नी आरती घेऊन जाते व त्याच शेतकऱ्याचा मुलगा हातातील तांब्यातील पाणी कडू लिंबाच्या डहाळीद्वारे बैलावर शिंपडत प्रदक्षिणा घालू लागतो. यावेळी पुढील शेतकरी ‘चांगभलं” अशी आरोळी मारतो पाठीमागून त्याची पत्नी व मुले ‘पाऊस आला घरला चला” असे आनंदाने म्हणतात. ही पूजा झाल्यानंतर शेतकरी सहकुटुंब पुरणपोळीचा आस्वाद घेतात. विशेष म्हणजे ज्या वर्षी घरात एखादे लग्नकार्य होते त्यावर्षी ही पूजा घरातील मंडळीऐवजी शेजारील शेतकऱ्यांकडून करून घेतली जाते अशी परंपरा आहे. अक्कलकोट तालुक्यात ज्यांच्या घरी बैलजोडी नाहीत असे लोक मातीचे बैल आणून पूजन करतात. त्यामुळे बाजारात असे मातीचे बैलही विक्रीला येतात.
त्यानंतर सायंकाळी गावातील प्रमुख वेशीतून बैलांची मिरवणूक काढली जाते. या परंपरेप्रमाणे मंद्रूप येथे शुक्रवारी मिरवणूक निघाली. यंदा पाऊस चांगला झाल्याने मिरवणुकीत अनेक शेतकऱ्यांनी बैलजोड्या सहभागी केल्या होत्या. बैलजोड्या बरोबरच रेडा, म्हशी, गाई यांचाही सहभाग लक्षणीय ठरला. काही शेतकऱ्यांनी बैलांच्या अंगावर पर्यावरणाचा संदेश लिहिला होता. गावातील प्रमुख शेतकऱ्यांनी मिरवणूक वाजत गाजत काढली. मिरवणूक मंद्रूप गाव तळ्यापर्यंत काढली जाते. त्यानंतर तेथून घराकडे या मिरवणुका परततात मिरवणुका परतत असताना मारुती मंदिराजवळ कर तोडली जाते. या मिरवणुकीत आपले नाव व्हावे म्हणून काही शेतकऱ्यांनी बारामती व अकलूज येथून मिरवणुकीसमोर नाचण्यासाठी घोडे आणले होते. त्यामुळे ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. हलगीच्या तालावर बैल जोडीपुढे नाचणारा घोड्याचा आवेश पाहून गावकरी थक्क झाले. बैल जोडी पुढे नाचणाऱ्या या घोड्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या स्टेटसला या घोड्याचा व्हिडिओ झळकला आहे.