सोलापूर : अलीकडे शेतीमध्ये नवीन प्रयोग केलेल्या यशस्वी शेतकऱ्यांच्या बातम्या सोशल मीडियावर झळकत आहेत. त्यामुळे आपणही असा नवीन प्रयोग करावा, असे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटते. पण असे नवीन प्रयोग करताना सर्व तांत्रिक माहिती घ्या अन्यथा विषय अंगलट येऊ शकतो. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील एका शेतकऱ्याच्या दोन गाई विषबाधेने मरण पावल्या आहेत.
शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पशुपालन करून दुग्ध व्यवसाय करताना आढळतात. कोरोना महामारीच्या काळानंतर दुग्ध व्यवसायात वाढ झाली आहे. अनेक बेरोजगार तरुण गाई व म्हशीचे संगोपन करून दुग्ध व्यवसाय करताना आढळतात. या व्यवसायात आता आधुनिकता आली आहे. त्यामुळे गाई व म्हशींच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पारंपारिक पद्धतीने गोपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आधुनिकतेची जोड देणे गरजेचे झाले आहे. पूर्वी शेतात गवत व लाकडापासून बनवलेल्या छपरामध्ये जनावरांची निगा राखली जायची. पण अलीकडे गोपालनामध्ये आधुनिकता आली आहे. पावसाळ्यात चिखलामुळे गोठा अस्वच्छ झाल्यामुळे गोचीड, माशा व गोमाश्यांचा जनावरांना त्रास होतो. यामुळे जनावरे आजारी पडतात. प्रसंगी साथीच्या आजारांना जनावरे बळी पडण्याचे प्रमाणही जास्त होते. यामुळे जनावरांना स्वच्छ व निरोगी राखण्यासाठी आधुनिक पद्धतीचे गोठे बांधण्यात येत आहेत. यामध्ये ऊन पावसापासून जनावराचे संरक्षण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या पत्र्यांचा वापर व मुक्त गोठ्यासाठी जाळी मारून दुग्ध व्यवसाय तेजीत आणला गेला आहे. गाई- म्हशीने जास्त दूध द्यावे म्हणून विविध प्रयोगाचा अंमल होताना दिसत आहे. गाई- म्हशींचे आरोग्य वाढून व त्यांना प्रोटीनयुक्त खाद्य पुरवून ज्यादा दूध कसे मिळवता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. यातून अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग केल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात मागील खरीप हंगामात पाऊस कमी पडला. त्यामुळे चाऱ्याची टंचाई भासत आहे. अशा स्थितीत उपलब्ध चाऱ्यातून जनावरांना पोषक खाद्य पुरवून दूध कसे वाढवता येईल असे प्रयोग होताना दिसत आहेत. यात ओला मका वाळवून खाद्य तयार करण्याचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. या चाऱ्याला मुरघास असे म्हटले जाते व असा चारा विक्रीलाही आला आहे. काही शेतकरी शेडमध्ये मक्याचे कोंब उगवून हा चारा दुभत्या जनावराला देताना दिसत आहेत.
मंद्रूप येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने मक्याच्या कोंबचा चारा तयार करण्याचा प्रयोग केला. पण तांत्रिक बाबीकडे लक्ष न दिल्याने मका पाण्यात फार काळ राहिल्याने कोंबला बुरशी आली व हा चारा दुभत्या जनावरांना खाऊ घातल्याने विषबाधा झाली आहे. यात दोन गाईंचा मृत्यू झाल्याने ‘त्या” शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे असे प्रयोग करताना त्याचे परिणाम काय होतात? याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा यात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन प्रयोग करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.