सोलापूर : अरे व्वा.. आठवड्यानंतर तो परतला अन शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
गेल्या वीस वर्षानंतर जूनच्या प्रारंभी सोलापूर जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या मोठ्या प्रमाणावर पेरण्या झाल्या आहेत. अक्कलकोट व बार्शी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी धुवाधार पाऊस झाला आहे. त्यामुळे ओढे-नाले वाहत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात मात्र बऱ्यापैकी पाऊस झाला होता. पावसाने विश्रांती घेतल्यावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. पाऊस लांबल्याने उगवण झालेल्या पिकांना पावसाची गरज निर्माण झाली होती. गेले आठवडाभर कडाक्याचे ऊन पडत असल्याने हवेत कमालीचा उकाडा जाणवत होता.अशात जोरदार वारे वाहू लागल्याने ढग पुढे जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आषाढवारा सुरू झाल्यावर पाऊस लांबतो, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग ढगाकडे डोळे लावून बसला होता. अशात रविवारी वाऱ्याचा वेग कमी झाला आणि ढग भरून आले. सोलापूर शहरासह जिल्ह्यात ठीक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. सोलापुरात तर संततधार पाऊस सुरू झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने यंदा खरीप चांगला साधणार अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. आषाढी वारीलाही सुरुवात झाल्याने वारकऱ्यांना पंढरीचे वेध लागले आहेत.
नुकसान भरपाई मिळावी…
गतवर्षी खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने भरपाई मंजूर केली आहे. लोकसभा निवडणुकी अगोदर ही भरपाई तलाठी कार्यालयाकडे आली होती. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गेल्या आठवड्यात ही रक्कम बँक खात्यात जमा होणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. पण निवडणुकीआधी केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शेती कामासाठी वेळेवर ही रक्कम मिळाल्यास अडचणी दूर होतील, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.