सोलापूर : जिल्ह्यात डायरिया या आजाराचे प्रमाण वाढू नये म्हणून जनजागृतीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात डायरिया या आजाराचे प्रमाण वाढू नये म्हणून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी दि.१ जुलैे ते दि.३१ ऑगस्ट या कालावधीत अतिसार थांबवा ( स्टॉप डायरिया ) हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.त्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या गावात पाणी व स्वच्छतेमध्ये शाश्वता ठेवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी व्यक्त केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सोमवार १ जुलै पासून पुढील दोन महिने म्हणजे ३१ आॕगस्टपर्यंत अतिसार थांबवा ( स्टॉप डायरिया ) हे अभियान राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील शाळा , अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची तपासणी एफ.टी.के.द्वारे करण्यात येणार आहे यामध्ये दूषित आढळलेले पाणी नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर या अभियानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येऊन ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणा, सर्व विभाग या अभियानात सहभाग घेऊन आठवडा निहाय नियोजन करण्यात आले आहे.गाव पातळीवर पाणी समितीची स्थापना, बळकटीकरण समितीद्वारे गाव पातळीवर पाण्याचे स्तोत्र स्वच्छता, स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत गावे ओडीएफ प्लस करणे, गाव पातळीवर कार्यात्मक नळ जोडणी करणे, छतावरील पाणी संकलन हात पंप दुरुस्ती याबाबत प्रत्यक्ष गाव पातळीवर प्रभात फेऱ्या काढून जनजागृती करण्यात येणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सांगितले.सदर अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीसह सर्व शासकीय यंत्रणा यांनी सहभाग घेऊन अतिसार थांबवा ( स्टाॕप डायरिया ) या अभियानाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले व ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड यांनी केले आहे. दूषित पाण्यामुळे हा आजार होतो त्यामुळे अतिसार होऊन धोका संभवतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. विहिरी, बोअरचे पाणी उकळून, गाळून पिणे आवश्यक आहे.
अतिसार थांबवा…..
या अभियान अंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम –
* जिल्हा व तालुका पातळीवर अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम व नियोजन
* जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक
* जाणीवजागृती कार्यशाळा आयोजित करणे
* गावासाठी सिटीझन कॉर्नरचे थेट प्रात्यक्षिक करण्यात यावेत
* पाण्याचे व्यवस्थापन व स्वच्छता जनजागृती कार्यक्रम
* कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणे
* अंगणवाड्यांमध्ये प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे
* शौचालय नियमित वापरासाठी विशेष उपक्रम राबवणे
* पाणी पुरवठा गळती शोधुन त्याची दुरूस्ती करणे व पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता उपक्रम राबविणे
* ज्या गावात अतिसाराच्या घटना घडल्या असतील त्या गावातील निर्जंतुकीकरण केंद्र / जल प्रक्रिया केंद्राचे कार्य तपासणीचे नियोजन
* स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ग्रामीण भागात ओडीएफ मुक्त / ओडीएफ प्लस अधिक दर्जा प्राप्त करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी आराखडा तयार करणे
* नादुरुस्त शौचालयाची दुरुस्ती मोहिम
* लोकसहभागातून सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करण्यासाठी श्रमदानाचे आयोजन करणे
* पाणी गुणवत्ता तपासणी मोहिमेचे आयोजन करणे