सोलापूर : सार्वजनिक आरोग्य विभागाने कुटुंब नियोजनासाठी ‘हम दो हमारे दो”, ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब” अशी घोषवाक्य तयार करून याच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे. पण या नियमांची अंमलबजावणी करणारे आरोग्य विभागाचे कर्मचारीच हा नियम तोडत असतील तर. जिल्हा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने हा नियम तोडल्याबाबत आलेल्या तक्रारीवरून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
देशाचा विकास वाढवण्यासाठी व लोकसंख्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर केलेले आहेत. त्यात आरोग्य विभागावर लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब” ही संकल्पना राबविण्याची जबाबदारी आहे. यासाठी आरोग्य विभाग एक किंवा दोनच मुलावर संतती नियंत्रण करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करीत असतो. यासाठी प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांवर दरवर्षी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची जबाबदारी दिली जाते. हा राष्ट्रीय उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी टार्गेट दिले जाते. त्यामुळे एक किंवा दोन मुलांवर कुटुंब नियोजनची शस्त्रक्रिया करण्याची मोहीम राबवली जाते. यात पुरुष नसबंदीची सोय आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी एकाच मुलीनंतर कुटुंब नियोजन करणाऱ्या महिलांना आरोग्य विभाग व जन्मलेल्या मुलींना महिला व बालकल्याण विभागातर्फे अनुदान दिले जाते. कुटुंब नियोजन कामगिरीचा आरोग्य विभागातर्फे दरमहा अहवाल राज्य व केंद्र शासनाला सादर केला जातो. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग सतत बैठका घेऊन कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असतो. त्यामुळे प्रत्येक आरोग्य कर्मचारी कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम प्रभावितपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील असतो. पण जिल्हा आरोग्य विभागातील एका महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी हा नियम तोडल्याची तक्रार आली आहे. सरकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांना सन 2005 नंतर दोन अपत्य असतील तरच सरकारी योजनांचा लाभ मिळतो. यानंतर तीन अपत्य असणाऱ्यांचे पद व नोकऱ्या गेलेल्या आहेत. तीन अपत्य असणाऱ्यांना निवडणूक लढता येत नाही व सरकारी नोकरीही मिळत नाही.
जिल्हा आरोग्य विभागातील होटगी प्राथमिक केंद्र अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यास तीन अपत्य असल्याची तक्रार भीमगिरी प्रतिष्ठान जय भीम मागासवर्गीय संघटनेने 20 मे रोजी केली आहे. सेवेत रुजू झाल्यानंतर मदरे येथील आरोग्यसेविकेला तीन अपत्य झाल्याची तक्रार या अर्जात केली आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विजय वरवटकर व कनिष्ठ प्रशासन अधिकारी गिरीश जाधव यांना या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. हा अहवाल आल्यानंतर आरोग्य विभाग संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा हा आदेश…