सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना पदभार घेऊन सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कारभाराला शिस्त व मुख्यालयाचे लुक बदलण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल कर्मचाऱ्यांमधून कौतुक होत आहे.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या बदलीनंतर जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सोलापुरातच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आयएएस अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी 22 जुलै 2023 रोजी पदभार घेतला. पदभार घेतानाच आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेमध्ये आहे त्या कामाला गती व शिस्तीवर भर देणार असल्याच्या संकल्प केला. जलजीवनच्या कामात बराच मोठा गोंधळ होता तो त्यांनी दूर करून कामे मार्गी लावली.  प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाला वेगळी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांचे रोस्टर गेल्या कित्येक वर्षात नव्याने केले नव्हते. त्यामुळे पदोन्नती व नवीन शिक्षक भरतीला मोठ्या अडचणी येत होत्या. हे काम मनीषा आव्हाळे यांनी पूर्णत्वाला नेले. हे करताना प्रतिक्रिया उमटल्या. त्यांचे केबिन फोडण्याचा प्रयत्न झाला पण त्या डगमगल्या नाहीत. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक शिक्षकाची फाईल तपासून नव्याने रोस्टर पूर्ण करून समाजकल्याण विभागाकडून मंजूर करून घेतले.

कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले.  प्रत्येक विभागात जाऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे दिले. महिला कर्मचाऱ्यांच्या भावना समजावून घेऊन कार्यालयात पान, तंबाखू, गुटखा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. त्यानंतर त्यांनी मुख्यालयाच्या इमारतीकडे प्राधान्याने लक्ष दिले.  इमारतीच्या मुख्य दर्शनी भागावर यापूर्वी अल्युमिनियमचे रेलिंग बसवताना काचा बसविल्यामुळे मुख्य इमारतीत हवा येत नव्हती. कोंदट वातावरणामुळे कर्मचाऱ्यांना त्रास होत होता.  ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांनी रेलिंगच्या काचा काढून त्या ठिकाणी खिडक्या बसवल्या. यामुळे मुख्य इमारतीत हवा खेळती राहू लागली पण हे काम करताना काही जणांनी ‘चला हवा येऊ” द्या अशी चेष्टाही केली. त्यालाही त्या डगमगल्या नाहीत. त्यानंतर सीईओचे दालन बदलून कॉर्पोरेटचा लुक दिला. जुन्या सीईओच्या कार्यालयात कृषी विभागाचे कार्यालय सुरू केले. इमारतीच्या अंतर्गत भागाचे व सभागृहाचा लुक बदलण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मांडण्याचा प्रशासक म्हणून सीईओ आव्हाळे यांना मान मिळाला.  यात त्यांनी शिक्षण विभागाला मोठी तरतूद केली. घरकुल, महिला बचत गट, आरोग्य विभागाच्या विविध योजनांना त्यांनी चालना दिली. शिक्षकांच्या पदोन्नती व बदल्याचा प्रश्न त्यांनी व्यवस्थितपणे हाताळला. पंचायत समितीअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे त्यांनी पार पडल्या. यंदा पाण्याची तीव्र टंचाई भासत होती. टंचाईच्या ठिकाणी जाऊन जुन्या बंद योजना सुरू करून टंचाईग्रस्त गावांना पिण्याचे पाणी देण्याचे त्यांनी नियोजन केले. रस्त्यांच्या कामांची स्वतः जाऊन पाहणी केली.

आषाढीवारी नियोजनाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. पालखी मार्गावर महिला वारकऱ्यांच्या सोयीसाठी हिरकणी कक्षाची वेगळ्या पद्धतीने मांडणी केली. वारी काळात स्वतः या ठिकाणी थांबून वारकऱ्यांना शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छता, निवास याकडे बारकाईने लक्ष दिले. त्यामुळे आषाढीवारी यशस्वी करण्याचा अभ्यास व वारकऱ्यांची सेवा केल्याचे समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या यशस्वी वर्षपूर्वीतीच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून कौतुक होत आहे.

हे झाले उल्लेखनीय…

सीईओ मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्यानंतर शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात येणारा आहार यासाठी किचन शेडची दुरावस्था असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपल्या घरातील किचनप्रमाणे शाळांचे किचन असावे अशी त्यांनी संकल्पना मांडली. झेडपीच्या सेस फंडात अशी तरतूद करून शाळांच्या किचनसाठी फ्रीज व भांडी देण्याची योजना केली. शाळांचा पट वाढविण्यासाठी स्वतःच्या मुलीला अंगणवाडीत प्रवेश दिला.

यानिमित्ताने या लिंक वरील आजच्या तारखेचा हा ‘योगायोग” पाहण्यासही विसरू नका…

https://www.facebook.com/share/p/Wz7RxfnpR23rrJtk/?mibextid=NoJtEM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *