सोलापूर : तब्बल 17 वर्षानंतर पुन्हा त्याच खुर्चीत बसण्याचा मान सोलापूर झेडपीतील एका अधिकाऱ्याला मिळाला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून संजय धनशेट्टी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे.
केंद्र शासनाच्या जलजीवन योजना सोलापूर झेडपीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या प्रशासकीय कारकीर्दसाठी शाप ठरली आहे. दीड वर्षात तब्बल 7 जणांना कार्यकारी अभियंता पदाचा पदभार घ्यावा लागला आहे. तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी 15 जुलै 2021 रोजी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून पदभार घेतला होता. त्यांच्या काळात जलजीवन योजनेच्या टेंडरला सुरुवात झाली. या काळात टेंडरमध्ये अनियमित्ता झाल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. डीपीसीत झालेल्या आदेशानुसार चौकशी समितीने कोळी यांच्यावर ठपका ठेवला. त्यामुळे 26 जुलै रोजी कोळी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. 10 फेब्रुवारी 2023 रोजी कोळी यांची बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांचा पदभार दक्षिण सोलापूरचे उपअभियंता सुनील कटकधोंड यांच्याकडे देण्यात आला. पुढे जलजीवनच्या चौकशीत कटकधोंड यांचे नाव आले म्हणून 31 ऑगस्ट 2023 रोजी त्यांचा पदभार काढून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पी. व्ही. पाटील यांची नियुक्ती झाली. त्यानंतर पुन्हा पाटील सोडून गेल्यावर एस. एस. गाडेकर यांची 22 डिसेंबर रोजी नियुक्ती झाली. त्यानंतर गाडेकर यांनीही 31 डिसेंबर 2024 रोजी पदभार सोडला. त्यामुळे हा पदभार पुन्हा कटकधोंड यांच्याकडे देण्यात आला आणि आता नव्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पदोन्नतीने संजय धनशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली. धनशेट्टी यांनी सोमवारी कटकधोंड यांच्याकडून ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्याचा पदभार स्वीकारला आहे
असाही आला योग…
कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांचा पदभार घेण्याचाही योग वेगळ्या पद्धतीने जुळला आहे. सन 2004 मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेत सांगोला येथे ते उप अभियंता म्हणून सेवेत रुजू झाले. त्यानंतर दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, करमाळा येथे त्यांनी 14 वर्षे सेवा बजावली. त्यानंतर सात वर्षे सोलापूर महापालिका आणि पुन्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे त्यांनी काम केले. जिल्हा परिषदेत उपअभियंता म्हणून कार्यरत असताना प्रभारी पी. एम. कृष्णमूर्ती यांच्यानंतर 21 जुलै 2007 रोजी धनशेट्टी यांना प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली होती. 31 ऑगस्ट 2007 पर्यंत त्यांनी हा कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर आता पदोन्नतीने त्याच खुर्चीवर कार्यकारी अभियंता म्हणून आज ते मोठ्या सन्मानाने रुजू झाले. प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी हा योग जुळून आल्याचे त्यांच्या स्वागतावेळेस नमूद केले. कटकधोंड यांनी आषाढीवारीच्या काळात वारकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी मोठे काम केल्याचेही धनशेट्टी यांनी यावेळी नमूद केले
जलजीवनच्या कामाचा आढावा
पदभार घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर कार्यालयातील प्रमुखांची बैठक घेऊन जलजीवनच्या कामाचा आढावा घेतल्याचे धनशेट्टी यांनी स्पष्ट केले. जलजीवनच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी सर्व तालुक्यांच्या उप अभियंत्याची बैठक बोलावल्याचे त्यांनी सांगितले. जलजीवनच्या कामाचे टप्पे करून ही कामे मार्गी लावण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे झाला उशीर
नियुक्ती होऊन पंधरा दिवस उलटले तरी पदभार घेण्यास उशीर का झाला? या प्रश्नाला उत्तर देताना कार्यकारी अभियंता धनशेट्टी म्हणाले की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असताना देशातील मोठी कामगार वसाहत असलेल्या रे नगर घरकुल पाणीपुरवठा योजना मार्गी लावली आहे. एका पुरस्कारासाठी या योजनेचे सादरीकरण करावयाचे असल्याने विलंब झाला. नियुक्तीच्या आदेशातच महिनाभराचे मुभा होती, असे त्यांनी स्पष्ट केले.