सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया असताना मतदान सुरू झाल्यावर मतपत्रिकेवर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारानी आक्षेप घेतल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक च्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडीसाठी रविवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे समर्थ तर विरोधी गटाच्या परिवर्तन पॅनलने चुरस निर्माण केली आहे. निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेल्या सोळा सभासदांना यापूर्वी मतदानास अपात्र ठरविले आहे. राजीनामा दिलेले अनेक सभासद असताना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठराविक सभासदांना अपात्र करण्यात आल्याचा आरोप परिवर्तन पॅनल ने केल्यामुळे वातावरण तापले होते. अशात आज मतदानाची प्रक्रिया सुरू असताना मतपत्रिकेवर सत्ताधाऱ्यांचे चिन्ह मोठे केल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केंद्राकडे जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड हे तातडीने केंद्रावर दाखल झाले.त्यांनी मतपत्रिका तपासून पाहिली. लेखी हरकत द्या कार्यक्रम पुढे ढकलू असा अभिप्राय दिल्यावर दोन्ही गटाच्या नेत्यांनी चर्चेअंती विषय समोपचाराने मिटवला व त्यानंतर मतदान सुरळीत सुरु झाले आहे.