सोलापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी २५१- दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मौलाली सय्यद बाशुमिय्या (बाबा मिस्त्री) यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकित काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज शनिवार दि. २७ जुलै २०२४ रोजी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सादर केला.
यावेळी अँड अब्दुल पठाण, बुरहान मुल्ला, अझर शेख, किसन मेकाले, तिरुपती परकीपंडला , भीमाशंकर टेकाळे, एन. के. क्षीरसागर, विजय शाबादी, शिरीष जाधव, सलीम मणूरे, राजू गडदे, मोहसीन फुलारी, महादेव येरनाळ, यतिश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार दिलीप माने यांनी वीस हजार रुपये भरून काँग्रेसकडे दक्षिण सोलापूर साठी उमेदवारी अर्ज मागणी केली आहे. त्यानंतर अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी बाबा मिस्त्री यांनी अर्ज दाखल केला. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसची स्थिती नाजूक होती. त्यामुळे अनेकांनी निवडणूक रणांगणातून पळ काढला. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यावेळी काँग्रेस पक्षाने स्वतःहून माझ्यावर जबाबदारी दिली. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने व माझ्या रुग्णसेवेच्या संपर्काने दक्षिण सोलापूर तालुका पिंजून काढला. मी अल्पसंख्यांक समाजातील असतानाही दक्षिण मधील मतदारांनी मला जोरदार ताकद दिली. काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या अपेक्षा पेक्षाही मला यश मिळाले. गेल्या वेळेस माजी आमदारकी थोडक्यात हुकली. आता काँग्रेसला चांगले वातावरण असून मला आमदार होण्याची संधी आहे. माझे नेते सुशीलकुमार शिंदे हे माझे स्वप्न पूर्ण करतील. त्यामुळे दक्षिणच्या उमेदवारीवर माझाच हक्क आहे, अशी प्रतिक्रिया बाबा मिस्त्री यांनी व्यक्त केली.