सोलापूर : आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अनेक इच्छुकांनी आपली इच्छुक मतदार संघातून वर्णी लागावी म्हणून जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या सोलापूर शहरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघ खूप चर्चेत आहे. या मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्यामुळे आता त्यांचे वारसदार कोण ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान हा मतदार संघ आपल्याला मिळावा म्हणून सर्वच पक्षांमधून इच्छुकांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. आता सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त व सेवानिवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनीही या स्पर्धेत उडी घेतली आहे.
महापालिकेचे आयुक्त म्हणून चंद्रकांत गुडेवार यांनी सोलापुरात जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंतच्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचे नाव प्राधान्याने चर्चेत येते. वास्तविक त्यांची बदली सोलापुरातील महापालिकेच्या गाळेभाडे वाढवरून झाली होती. शहरातील महापालिकेच्या गाळ्यांना जुन्या पद्धतीनेच भाडे आकारणी होत होती. गुडेवार यांनी महापालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून रेडीरेकनरचा दर डोळ्यासमोर ठेवून गाळे भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला. याला व्यापाऱ्यातून विरोध झाला. त्यामुळे महापालिकेच्या सभेतही भाडेवाडीचा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे हा प्रस्ताव शासनाकडे गेला. शासनाने गुडेवार यांचा प्रस्ताव मंजूर करत महापालिकेला अंमलबजावणी करण्याबाबत सांगितले. त्यानंतर बऱ्याच चर्चानंतर शहरातील गाळ्याची भाडेवाढ झाली. पण गाळे भाडेवाढ प्रस्तावावेळी व्यापारी संतप्त झाल्यावर आमदार विजयकुमार देशमुख यांनीही याला विरोध केला. त्यामुळे दोघात खटके उडाले व गुडेवार यांची बदली झाली. पण सोलापुरातील अतिक्रमण हटाव मोहीम म्हटले की गुडेवार यांचे नाव समोर डोळ्यासमोर येते. विजापूररोड, होडगी रोडने मोकळा श्वास घेतला तो गुडेवार यांच्यामुळेच. शहरातील अपघात कमी झाले ते गुडेवार यांच्यामुळेच. शहरात पार्किंगमध्ये थाटलेली दुकाने गुडेवार यांनी बंद केली व पार्किंग खुले केले. दुहेरी जलवाहिनीला त्यांनीच प्रशासकीय मान्यता आणली. प्राणी संग्रहालय, मंडई, रस्ते सुधारण्याकडे त्यांनी लक्ष दिले. निकृष्ट रस्ते करणाऱ्या ठेकेदारांना धडा शिकवला. बांधकाम परवान्यात लक्ष घातले. अनेक बेकायदा बांधकामावर हातोडा मारला. ते जिथे जातील त्या इमारतीची पाहणी करत. काही गैर दिसले की जेसीबी हजरच. त्यामुळे पार्किंग व झाडे लावल्याशिवाय बांधकाम परवानाच मिळत नव्हता. महापालिकेतील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता त्यांनी काम केले. असा इतिहास असला तरी गुडेवार आणि सोलापूर याची नाळ तुटली नाही. पूर्व भागातील मार्कंडेय रथोत्सव व इतर सामाजिक कार्यक्रमाला त्यांची हजेरी आवर्जून आहे. पूर्व भागात त्यांची लोकप्रियता मोठी आहे. महापालिका आयुक्त असताना सामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले. त्यामुळे नागरिकांची त्यांना मोठी पसंती आहे. काही दिवसांपूर्वी ते प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. आपल्या मुलीचा स्वागत समारंभ त्यांनी सोलापुरातच केला. त्याचबरोबर अनेक मान्यवरांच्या कार्यक्रमाला त्यांची आवर्जून हजेरी असते.असे असले तरी त्यांचे नातेसंबंध सोलापूरकरांची कायम राहिले आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून कोणत्या पक्षाकडून कोण इच्छुक याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस माकपने काँग्रेसला पाठिंबा दिला. त्या बदल्यात काँग्रेसने हा मतदार संघ माकपला दिल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे शिवाजी सावंत, उद्धव गटातर्फे पुरुषोत्तम बर्डे, भाजपतर्फे देवेंद्र कोठे यांची नावे चर्चेत आहेत. असे असताना आता चंद्रकांत गुडेवार यांनीही सोलापुरातून शहर मध्य मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून ते इच्छुक आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपला बायोडाटा नुकताच सादर केले असल्याचे सांगण्यात आले आहे. शहर मध्य मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असल्याचे त्यांनी कळवले आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणातही एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने उडी घेतली आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात तेलगू समाजात गुडेवार लोकप्रिय आहेत. ते मूळचे वसमतचे असून त्यांची आई भाजपच्या नगरसेविका होत्या. घरचा भाजपकडून राजकीय वारसा आहे. त्यामुळे आपण फक्त भाजपकडे इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी अनेक ठिकाणी सेवा केली असली तरी सोलापुरात गुडेवार यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर असल्याने याचा फायदा भाजपला होईल असे त्यांनी नमूद केले आहे. फडणवीस आता यावर काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.