सोलापूर : ठेवीदारांस फसविल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल असलेले संत सेवालाल निधी बँकेचे शिवाजी जाधव गुरुजी व त्यांचा मुलगा सचिन जाधव यांना अटक करण्यात आल्याची माहिती  या गुन्ह्याचे फिर्यादी योगेश पवार यांनी दिली आहे.

दक्षिण सोलापुरातील मंद्रूपच्या  संत सेवालाल निधी बँकेच्या संचालकांनी फसवणूक केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 589/2024 अन्वये BNS चे कलम 316(2), 318(3), 318(4) व महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियमचे कलम 3 नुसार शिवाजी जाधव, पत्नी सुनीता जाधव, मुलगा सचिन जाधव, सून  पुजा जाधव, मुलगी सुजाता चव्हाण, सीमा शाह, मधुबेन पटेल व अर्चना देशपांडे यांचेविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शिवाजी जाधव व सचिन जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे, असे फिर्यादी योगेश पवार यांनी सांगितले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. 12/09/2022 रोजी योगेश पवार यांनी संत सेवालाल निधी बँकेत प्रति महिना एक टक्क्यांच्या परतावा हमीवर 50000 रुपयांची एफ.डी ठेवली होती. परंतु, डिपॉझिटनंतर शिवाजी जाधव व संचालकांनी, एक टक्क्याप्रमाणेचा परतावा एकदाही दिला नाही. व मुदतपूर्व एफ.डी मोडून एफ.डी.चे व परताव्याचे पैसे परत मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे देवून पैसे देण्यास टाळाटाळ केली. संत सेवालाल निधी बँकेच्या संचालकांनी डिपॉझिटच्या रक्कमेतून गणेश फायनान्समार्फत स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कर्जे वाटली.  योगेश पवार यांचे 50000 रुपये डिपॉझिट व त्यावरील 22 महिन्याचा 11000 रुपये परतावा असे एकूण 61000 रुपये इतकी रक्कम दिली नाही. तसेच ठेवीच्या पैश्याचा गैरव्यवहार करून ठेवीदारांची फसवणूक केल्याची फिर्याद योगेश नागनाथ पवार यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लकडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *