राजकुमार सारोळे
स्पेशल रिपोर्ट
सोलापूर : महाराष्ट्र : कर्नाटक सीमावाद जुनाच आहे. पण सीमेवरील शेतकरी ज्यावेळी कर्नाटक सरकारची स्तुती करू लागतात तेव्हा महाराष्ट्र सरकारला जागे व्हावेच लागेल. होय, महाराष्ट्र सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखे कर्नाटक सरकारने सीमेवर काम केले आहे. भीमा नदीवर महाराष्ट्रातील सादेपूर- लवंगी व कर्नाटकातील उमराणी दरम्यान कर्नाटक सरकारने 133 कोटी रुपये खर्चून भव्य अत्याधुनिक असा बंधारा उभा केला असून जो दोन्हीकडच्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरला आहे.
उजनी धरण सोलापूरसाठी वरदायी ठरले आहे. पण या धरणातून पुणे, नगर जिल्ह्याबरोबरच मराठवाड्यासाठी पाणी गेल्यामुळे मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी तहानलेलेच आहेत. त्यामुळे गेल्या दशकापासून वडापूर येथे दोन पीएमसी क्षमतेचे धरण बांधण्याची फक्त चर्चाच होत आहे. कर्नाटक सरकारने यापुढे उडी घेत महाराष्ट्राच्या सीमेवर लवंगी सादेपूर दरम्यान उमराणीजवळ पाऊण टीएमसी क्षमतेचा मोठा बंधारा कम पूल उभा केला आहे. यासाठी कर्नाटक सरकारने कृष्णा भाग्य निगममधून 133 कोटी रुपये खर्च केले आहेत. या बंधाऱ्यात पाणी अडवून विजयपूर जिल्ह्यातील सर्व तलाव भरण्याची कर्नाटक सरकारची योजना आहे. या बंधाऱ्याचा कर्नाटकबरोबर महाराष्ट्रातीलही शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. नदीच्या अलीकडच्या शेतकऱ्यांना या बंधाऱ्यातील पाणी मिळाले आहे.
कर्नाटक सरकारने या ठिकाणी बंधाऱ्याबरोबरच मोठा पूल उभा केला आहे. यामुळे चडचणला कापड बाजारासाठी जाणाऱ्या सोलापुरातील लोकांना फायदा झाला आहे. भीमा पाटबंधारे विभागाने उजनी धरण भरल्यानंतर नुकताच सव्वा लाख कुसेक्स तसेच निरेतून पाणी सोडल्यामुळे पंढरपूरला पूर आला होता. पण तरी हा पूल पाण्याखाली गेला नाही हे विशेष. भविष्यात कर्नाटक सरकारने उमराणीपासून बेळगाव पर्यंत 290 किलोमीटरचा महामार्ग तयार करण्याची योजना तयार केली आहे. यामुळे भविष्यात मंद्रूप तालुका झाल्यास कर्नाटकशी या मार्गे संपर्क वाढणार आहे. कर्नाटक सरकारने केलेल्या या सोयीमुळे या परिसरातील शेतकरी आनंदित झाले आहेत पण महाराष्ट्र सरकारला वडापूर बंधारा बांधण्याबाबत अजून जाग आलेली नाही याबाबत संतापही व्यक्त होत आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादात भविष्यात या परिसरातील लोकांची मते जाणून घेतल्यास महाराष्ट्र सरकारची अडचण होणार आहे. कर्नाटक सरकारने सीमेवर केलेल्या या सोयीमुळे महाराष्ट्र सरकारने आता तरी जागे होण्याची वेळ आहे अशी प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
जमीन दिली फुकट…
कर्नाटक सरकारच्या या बंधाऱ्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीन फुकट दिली आहे. या बंधाऱ्यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील जमिनीचे संपादनच केले नसल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले. दक्षिण सोलापूरचे नेतृत्व आमदार सुभाष देशमुख करतात. भविष्यात मंद्रूप तालुका करण्याच्यादृष्टीने त्यांनी मंद्रूपला एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांनी जमीन न दिल्यामुळे हा प्रकल्प परत गेला होता. पण पाण्यासाठी शेतकरी किती तळमळीने आपली जमीन सरकारला देऊ करतात याचा बोध महाराष्ट्र सरकारने घेण्याची गरज आहे. वडापूर धरण ही काळाची गरज आहे अन्यथा भविष्यात सीमेवरील शेतकरी महाराष्ट्र सरकारला माफ करणार नाही असा संताप व्यक्त होत आहे.