सोलापूर : सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्यानंतर आता अधीक्षक अभियंत्याच्या खुर्चीसाठी संगीत खुर्चीचा खेळ रंगला आहे. अधीक्षक अभियंता संजय माळी यांना खुर्ची सोडवत नसल्याने नव्याने नियुक्त झालेल्या संभाजी धोत्रे यांची नियुक्ती रखडली आहे.
सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता गावडे यांची यापूर्वी बदली झाली होती. पण त्यांनाही खुर्ची सोडवत नव्हती. त्यामुळे ठाकरे यांना मॅटमध्ये जाऊन आदेश कायम करून आणावे लागले होते. त्यानंतर मात्र गावडे यांना खुर्ची सोडून ठाकरे यांना द्यावी लागली होती. आताही अशीच परिस्थिती झाली आहे. अधीक्षक अभियंता संजय माळी यांची बदली झाली आहे मात्र शासनाने त्यांना पुढील नियुक्ती दिलेली नाही. त्यांच्या जागेवर संभाजी धोत्रे यांची नियुक्ती झाली आहे. धोत्रे पदभार घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत पण माळी यांनी त्यांना पदभार दिलेला नाही. बदलीचा पुढील आदेश नसल्याने माळी यांनी मॅटमध्ये धाव घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे धोत्रे यांनी शासनाकडे नियुक्ती मिळावी म्हणून पाठपुरावा सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सोलापूर बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंत्याच्या संगीत खुर्चीचा खेळ राज्यभर चर्चेचा झाला आहे.
याला कारण ही तसेच मजेशीर असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने जिल्ह्यातील मोठ्या कामांचे टेंडर प्रस्तावित झाले आहेत. हे टेंडर मंजूर करून वर्कऑर्डर देण्याच्या वेळेस बदली म्हणजे पंचपकवान्न तयार करून ठेवल्यानंतर तोंडात घास घ्यायच्या वेळेसच वादळ सुटावे असे झाल्याची खुमारसदार चर्चा बांधकाम विभागात सुरू झाली आहे.