सोलापूर : आयपीएस झाल्यानंतर ज्या कार्यालयात प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून कामकाज पाहिले त्याच कार्यालयात एसपी म्हणून खुर्चीत बसण्याचा मान शुक्रवारी अतुल कुलकर्णी यांना मिळाला.
सोलापूर ग्रामीण पोलीसचे मावळते पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याकडून नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शुक्रवारी पदभार घेतला. मूळचे बेळगावचे असलेल्या कुलकर्णी यांची आयपीएस झाल्यानंतर पहिल्यांदा प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर ग्रामीणकडे नियुक्ती झाली होती. त्यावेळेस वीरेश प्रभू हे पोलीस अधीक्षक होते. प्रभू यांनी माळशिरस पोलीस ठाण्याची कुलकर्णी यांच्यावर जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्यांची पुढील पोस्टिंग झाली. धाराशिवचे अधीक्षक म्हणून कामकाज पाहिल्यानंतर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी त्यांनी पदभार घेतला. सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती आहे. महिला सुरक्षा व सायबर क्राईमवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मावळते अधीक्षक देशपांडे यांनी त्यांच्या भावी कार्यकाळास शुभेच्छा दिल्या.