सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा मुस्लिम समाजाला सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी दिली .
सोलापुरातील काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका आणि यशदा युवती फाउंडेशनच्या अध्यक्षा फिरदोस पटेल यांची ” मौलाना आझाद एकता संघ ” महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे झालेल्या बैठकीत माजी मंत्री नसीम खान तसेच समाजवादी पार्टीचे संस्थापक आमदार अबू असीम आझमी यांच्याहस्ते फिरदोस पटेल यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले, यावेळी माजी मंत्री नसीम खान बोलत होते. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षामध्ये मुस्लिम समाजाला म्हणावा तसा न्याय मिळत नाही. लोकसभेनंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुस्लिम समाजासाठी काँग्रेस पक्षाकडून ३० जागा मिळाव्यात यासाठी आपण आग्रही राहणार आहोत. तसेच सोलापूर शहर मध्यची जागासुद्धा मुस्लिम समाजाला सोडवून घेण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे प्रयत्न करणार असल्याचे, माजी मंत्री नसीम खान यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मुस्लिम समाज सत्तेपासून कायमच दूर राहिला आहे. तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला आरक्षण नसल्यामुळे समाजातील मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. वक्फ बोर्डच्या जमिनी सरकारच्या चुकीच्या नियमामुळे अडचणीत आल्या आहेत. विधानसभेत मुस्लिम समाजाचा लोकप्रतिनिधी निवडून गेल्यास मुस्लिम समाजाचे महत्त्वाचे प्रश्न आणि अडचणी मांडण्यासही मोठी मदत होणार आहे. या विषयावरही मौलाना आझाद एकता संघाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांना मौलाना आझाद एकता संघाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर संधी देण्यात आली आहे.
या बैठकीला मौलाना आझाद एकता संघाचे प्रदेशाध्यक्ष निजामुद्दीन राहीन, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सादिक खान ,सरचिटणी युसूफ अन्सारी ,उपाध्यक्ष ए.ए. इनामदार , शौकत पटेल, लालाखान पठाण यांच्यासह एकता संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्याचा गौरव !
राजकारणात येण्यापूर्वी आपण सर्वप्रथम सामाजिक कार्यात वाहून घेत अनेक वर्षे समाजसेवेचे काम केले असून आजही ते काम अविरतपणे सुरू आहे. त्यानंतर राजकारणात येत सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असताना यशदा युवती फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व समाजातील गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सातत्याने प्रयत्न केले .अनेकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदतीचा हात दिला. इतकेच नव्हे तर आरोग्याच्या भीषण समस्या सोडविण्यालादेखील प्राधान्य दिले आहे .आतापर्यंत आपण केलेल्या या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून आपली मौलाना आझाद एकता संघाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे .या पदाचा आपण आणखी सामाजिक कार्य वाढविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. समाजकारण करत असताना आपण ज्या पक्षात काम करतो. त्या काँग्रेस पक्षाचेसुद्धा निष्ठेने काम करत आहोत. या व अन्य सामाजिक कामाची पावती आपल्याला एकता संघाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीने मिळाली असल्याचे, माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.