सोलापूर : ठेवीदारांना फसविल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल असलेले संत सेवालाल निधी बँकेचे शिवाजी जाधव गुरुजी यांच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास आता सोलापूर ग्रामीण पोलीस करणार आहेत.
दक्षिण सोलापुरातील मंद्रूपच्या संत सेवालाल निधी बँकेच्या संचालकांनी फसवणूक केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 589/2024 अन्वये BNS चे कलम 316(2), 318(3), 318(4) व महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियमचे कलम 3 नुसार शिवाजी जाधव, पत्नी सुनीता जाधव, मुलगा सचिन जाधव, सून पुजा जाधव, मुलगी सुजाता चव्हाण, सीमा शाह, मधुबेन पटेल व अर्चना देशपांडे यांचेविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शिवाजी जाधव व सचिन जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याबाबत योगेश पवार यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. 12/09/2022 रोजी योगेश पवार यांनी संत सेवालाल निधी बँकेत प्रति महिना एक टक्क्यांच्या परतावा हमीवर 50 हजार रुपयांची एफ.डी ठेवली होती. परंतु, डिपॉझिटनंतर शिवाजी जाधव व संचालकांनी एक टक्क्याप्रमाणेचा परतावा एकदाही दिला नाही. व मुदतपूर्व एफ.डी मोडून एफ.डी.चे व परताव्याचे पैसे परत मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे देवून पैसे देण्यास टाळाटाळ केली. संत सेवालाल निधी बँकेच्या संचालकांनी डिपॉझिटच्या रक्कमेतून गणेश फायनान्समार्फत स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कर्जे वाटली. योगेश पवार यांचे 50 हजार रुपये डिपॉझिट व त्यावरील 22 महिन्याचा 11 हजार रुपये परतावा असे एकूण 61 हजार रुपये इतकी रक्कम दिली नाही. तसेच ठेवीच्या पैश्याचा गैरव्यवहार करून ठेवीदारांची फसवणूक केल्याची फिर्याद योगेश नागनाथ पवार यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लकडे यांनी केला. यााा दरम्यान 25 जणांनी तक्रार दिली. जाधव गुरुजीचा हा घोटाळा दोन कोटी पर्यंत पोहोचला. या घोटाळ्याच्या तपासासाठी न्यायालयाने जाधव गुरुजीला चार वेळा पोलीस कोठडी दिली.
सेवालाल बँकेचे क्षेत्र मंद्रूप आहे. मंद्रूप पोलीस ठाण्यात इतर आणखी बऱ्याच ठेवेदारानी तक्रारी दाखल केल्या आहेत. घोटाळ्यातील रक्कम जाधव गुरुजींनी कुठे गुंतवली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या परवानगीने या गुन्ह्याचा तपास सोलापूर ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे आता पुढील तपास ग्रामीण पोलीस करणार आहेत. अद्याप बँकेच्या इतर संचालकांना अटक झालेली नाही. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांच्यासमोर हे प्रकरण आले. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल तपास केला जाईल व ठेवीदारांना न्याय दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.