सोलापूर : बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागात शासन गांभीर्यपूर्वक बदल करण्याच्या विचारात असतानाच सोलापूर झेडपीच्या शिक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमातच गोंधळ झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. सोलापूर झेडपीच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे गुरुवारी सिंहगड कॉलेजमध्ये आयोजित प्रशिक्षणात शिक्षकांना बसण्यासाठी जागाही नव्हती अशा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण होते की श्रावणातले प्रवचन? असा संतप्त सवाल शिक्षकांनीच उपस्थित केला आहे.

बदलापूर घटनेनंतर शासनाने सर्व शाळांमध्ये सीसी कॅमेरे बसवण्याचा आदेश दिला आहे. या कॅमेरावर नियंत्रणाची जबाबदारी मुख्याध्यापकांवर देण्यात आली आहे. बऱ्याच शाळांमध्ये यापूर्वीपासून कॅमेरे आहेत पण ते बंद चालू अवस्थेत असतात अशा बाबी उघड झाले आहेत. तर कित्येक कॅमेऱ्यामध्ये डेट व टाइमिंग सेट केले नसल्याच्या समोर आले आहे. यावर गंभीर चर्चा होत असतानाच सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गुरुवारी मोहोळ,उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, व अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाला शिक्षकांची उपस्थिती इतकी मोठी होते की सभागृह अपुरे पडले. मिळेल त्या जागेवर बसून शिक्षकांनी प्रशिक्षणाची हजेरी पूर्ण केली पण या प्रशिक्षणाचा हेतू साध्य झाला का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रशिक्षणात मार्गदर्शनासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख उपस्थित होते. त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले पण शेवटच्या खुर्चीवर बसलेल्या शिक्षकांना व बाहेर मिळेल तिथे जागा धरून बसलेल्या शिक्षकांना  त्यांचा आवाज ऐकू गेलाच नाही. अशा या प्रशिक्षणाचे नियोजन कोणी केले? असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

शिक्षणाधिकारी कादर शेख हे प्रामाणिकपणे शिक्षण विभागात बदल घडवून आणू इच्छित असताना विभागाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही अधिकाऱ्यांनी केला असल्याचा आरोप होत आहे. दक्षिण व अक्कलकोटच्या गटशिक्षणाधिकार्‍यावर शिक्षकांनी निशाणा साधला आहे. हे दोघे शिक्षकांच्या प्रश्नांकडे गांभीर्यपूर्वक पाहत नाहीत. शिक्षकांनी मार्गदर्शनासाठी अक्कलकोटच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यास त्यांना त्रास होतो. दक्षिणच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे शाळांकडे लक्ष नाही. शाळांमध्ये फक्त खिचडीचा आहार दिला जात आहे, अशा शाळांची तपासणी करून संबंधित शिक्षकांना कोण जाब विचारणार? असे प्रश्न अनेक शिक्षकांनी  उपस्थित केले आहेत.

शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना…

या प्रशिक्षणात शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी आदर्श गुणवत्तेचा संवाद साधून उपस्थित शिक्षकांना मौलिक सूचना केल्या आहेत. किती शाळांचा पट वाढला? विद्यांजली पोर्टल नोंदणी करा. माझी शाळा सुंदर शाळा नोंदणी करून उपक्रम राबवा.  PAT चे पेपर नीट तपासा. गुणवत्तेवर CEO, EO यांचे लक्ष आहे. शाळेच्या वेळेत कोणत्याही शिक्षकाला क्षुल्लक कामासाठी सोडू नका. अवांतर वाचन करणारे शिक्षक किती आहेत? किती शिक्षक व्यायाम करतात? कामाचं टेन्शन घेऊ नका, मुलांना किती येतय त्याचं टेन्शन घ्या. माझी शाळा सुंदर शाळा, प्रत्येक मुद्दयाची जबाबदारी वाटून घ्या, शाळेत परसबाग करा. जागा नसेल तर कुंड्या आणा. सखी सावित्री समिती स्थापन करा.  फक्त गुरुला परब्रम्ह म्हणतात इतरांना नाही – त्याप्रमाणे वागा. तक्रारपेटी – विद्यार्थ्यांना सहज जाता येईल अशा ठिकाणी असावी, दर शनिवारी उघडा. मुख्याध्यापक शाळेचा बॉस आहे. त्याने शाळेचे वातावरण निर्भिड, निर्मळ व सर्वसमावेशक ठेवावे. विद्यार्थी महाविकास अभियानाकडे गांभिर्यांने लक्ष दया. महावाचन उत्सव सक्षमपणे राबवा. अमृत रसोई – खोलीत स्वच्छता, धान्य, धान्यादी मालाची योग्य साठवणूक करा, परसाबागेतील उत्पादन मुलांसाठी करा,मुलं जेवतात ती जागा स्वच्छ असावी. शालेय पोषण आहाराचे विविध मेनू प्रामाणिकपणे राबवा. धोकादायक खोल्या , अडगळ याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. दिव्यांग अस्मिता अभियान – कॅम्पकडे लक्ष द्या. मुलगा शिकून गेल्यानंतर रजि १ मध्ये नाव बदल करायचा अधिकार मुख्याध्यापकांना नाही,  प्रस्ताव EO कडे पाठवावा. ४थी, ७वी प्रज्ञाशोधसाठी तयारी करा.  स्काउट गाईड नोंदणी करा. रजा व्यवस्थित भरूनच शिक्षकांना सोडा. मनापासून काम करा. आपला तालुका जिल्ह्याचे नेतृत्व करेल असं काम करा. शिक्षण अधिकाऱ्यांनी  शिक्षण विभागाचे नाव जिल्ह्यात होईल असे काम करण्याचे शिक्षकांना आवाहन केले. पण ढिसाळ नियोजनामुळे त्यांचा हेतू सफल झाला का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *