February 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापुरात पंधरा वर्षांपूर्वी “या’ कारणासाठी फुलले होते हे चेहरे

राजकुमार सारोळे 

सोलापूर विशेष 

सोलापूर : सोलापूरकरानो एसएमटीची लालपरी तुम्हाला रस्त्यावर कुठे दिसते का? कोण पुसते तिला. नाही, आम्हाला तिची गरजच उरली नाही. उगाच आम्ही तासंनतास तिची वाट पाहायचो, पण तिचा पत्ता नसायचा. तिच्या भरवशावर आम्ही किती दिवस राहायचे. शेवटी गाठतो टमटम आणि काढलीच आहे दुचाकी. त्यामुळे आम्हाला तिची आठवण यायचा प्रश्नच नाही. सोलापूरकरांची आता अशी आहे अवस्था. सतरा वर्षांपूर्वी हेच चित्र होते पण एका अधिकाऱ्याने मनावर घेतले आणि एसएमटी स्वयंपूर्ण झाली अन कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर असे हास्य फुलले होते. याला साथ दिली होती ती माजी पालकमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांनी.

होय सोलापूरकरहो, ऑगस्ट 2009 मधील हा दिवस आठवतोय. महानगरपालिकेची परिवहन सेवा स्वयंपूर्ण झाली होती. 260 बस रस्त्यावर धावत होत्या. चक्क एसएमटीने महापालिका हद्दीबाहेर 50 किलोमीटर सेवा देण्यास एसटी महामंडळाकडे परवानगी मागितली होती. या परवानगीनंतर मंगळवेढा, वैरागपर्यंत एसएमटीची बस धावणार होती. यावरून एसटी महामंडळ व एसएमटीत वादही सुरू झाला होता. पण आज काय स्थिती आहे. याला कोण जबाबदार? महापालिकेत काँग्रेसची सत्ता उलथवून कारभार हाती घेतलेल्या भाजपच्या नेत्यांनी काय केले? व्हिजन नसलेली मंडळी राजकारणात आल्यामुळे गरिबांच्या लाल परीची वाट लागली. अनेकांना बेकार व्हावे लागले. अपघातात वाढ झाली. तरीही अजून बॅटरीवरील बस येतच आहेत. सध्या मनपा परिवहनचा मॅनेजर कोण? हे लोकांना सांगने अवघड झाले आहे. 7 आणि 8 नंबरचे बस फलक केव्हाच पुसून गेले आहेत. महापालिका आयुक्तांना  नागरिकांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याची आपली कायद्यान्वये जबाबदारी आहे, याचा विसर पडल्याचे सद्यस्थितीवरून दिसत आहे. निद्रा अवस्थेत असलेल्या या प्रशासनाला जागे कोण करणार? हा प्रश्न आहे. सोलापुरातील नागरिकांची सहनशीलता याला कारणीभूत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

काय घडले होते पंधरा वर्षांपूर्वी

जून 2009 मध्ये सोलापुरात बदली झाली म्हणून पुण्याचा एक अधिकारी डोळ्यावर गॉगल लावून सोलापूर रेल्वे स्टेशनवर उतरला. स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर “त्या’ अधिकाऱ्याने एका रिक्षाला हात केला व डाक बंगल्याला चल अशी सूचना केली. रिक्षात बॅग टाकून  सोलापूरचे सौंदर्य पाहत ते अधिकारी डाक बंगल्यात पोहोचले. त्यावर रिक्षा चालकाने त्यांच्याकडून शंभर रुपये भाडे घेतले. दोन किलोमीटरला शंभर रुपये? असा सवाल त्यांनी रिक्षा चालकाला केला. ये शोलापूर है साब… असे म्हणत त्याने रिक्षा पुढे दामटली. दुसऱ्याच दिवशी आरटीओ ऑफिसमध्ये नवीन साहेब आल्याची चर्चा सुरू झाली. ही माहिती मिळताच पत्रकारांनी त्यांची भेट घेतली.त्यावेळी “त्या’ अधिकाऱ्याने आपली ओळख सांगितली. राजेंद्र मदने, डेप्युटी आरटीओ. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी रिक्षावाल्याचा अनुभव सांगितला. त्यावर पत्रकारांनी सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन व्यवस्थेच्या दुरावस्थेची त्यांना माहिती दिली आणि त्याचवेळी  मदने यांनी संकल्प केला की सोलापूर महापालिकेची परिवहन व्यवस्था मी सुधारणारच. तत्कालीन महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी परिवहन व्यवस्थेची माहिती घेतली. परिवहन व्यवस्था सुधारण्याचा त्यांनी आराखडा तयार केला. तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांनी या आराखड्याला मंजुरी दिली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याला बळ दिले. बुधवारपेठ बस डेपोत जुन्या बंद पडलेल्या बसचे आरटीओ राजेंद्र मदने यांनी पुनर्जीवन केले आणि भंगारातून नवी कोर झालेली “फिनिक्स’ बस सोलापूरच्या रस्त्यावर दिसू लागली. या बसचे कौतुक पाहून  अजितदादांनी स्वतःच्या खर्चातून एक नवीन मिनी बस दिली. इतर नवीन बस घेण्यासाठी  निधी दिला. अन बघता बघता सोलापूरच्या रस्त्यावर परिवहनच्या बस दिसू. एसएमटीची व्यवस्था सुधारणेबरोबरच  मदने यांनी सोलापूरच्या रस्त्यावरची वाहतूकही वळणावर आणली. तत्कालीन पोलीस आयुक्त शहीद अशोक कामटे यांनी त्यांच्या या प्रयत्नाला मोलाची साथ दिली. यामुळे ऑगस्ट 2009 मध्ये सोलापूरची एसएमटी स्वावलंबी बनली. मदने यांच्या “प्रोजेक्ट फिनिक्स’ ला शासनाचे पहिले बक्षीस मिळाले.  तत्कालीन पालकमंत्री विजयदादा यांच्या उपस्थितीत सातरस्ता डेपोमध्ये एसएमटीच्या  स्वावलंबनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी माजी आमदार नरसया आडम यांनी मदने यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यावेळी कामगारांच्या चेहऱ्यावर फुललेले हे हास्य आहे. मदने यांच्या बदलीनंतर पुन्हा एसएमटीची दुरावस्था झाली. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नातून एसएमटीला दोनशे नव्या कोऱ्या बस मिळाल्या. पण या बसमध्ये चेसी क्रॅक झाल्यामुळे समस्या वाढत गेली. त्यानंतर एसएमटीची सक्षमपणे धुरा सांभाळणारा अधिकारी मिळालाच नाही. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पण एसएमटी सक्षमपणे चालवणारा अधिकारी मिळाला नाही. आज एसएमटी शेवटची घटका मोजत आहे. त्याचे कोणाला सोयरसुतक दिसत नाही. विविध योजना राबवून राज्य परिवहन मंडळाची लाल परी आता रस्त्यावर वेगाने धावत आहे. मग सोलापूरकरांनो विचार करा, आपली एसएमटी का मागे?