सोलापूर : पुणे, अहिल्यानगर बॉर्डरवरील करमाळा तालुक्यात तापाचे रुग्ण आढळल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी तात्काळ तेथे भेट देऊन खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यात कोठेही “मंकी पॉक्स’चे रुग्ण आढळलेले नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

करमाळा तालुक्यातील रिधोरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत तापाचे रुग्ण आढळल्याची तक्रार  आली होती. पुणे व अहिल्यानगर सीमेलगतचा हा भाग येत असल्याने दोन्हीकडच्या लोकांची ये- जा असते. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने याची तात्काळ दखल घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी रिधोरे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात भेट देऊन रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी केली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी काटकर उपस्थित होते. संबंधित रुग्णांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे दिसून आले. या रुग्णांमध्ये मंकी पॉक्सची कोणतीच लक्षणे नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. करमाळा पंचायत समितीमध्ये बैठक घेऊन परिसरात खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्या भागात तापाचे रुग्ण आढळून येत आहेत त्यांची रक्त तपासणी, रुग्णांच्या घराच्या परिसरात  कीटकनाशक फवारणी तत्काळ करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात मंकी पॉक्सची लक्षणे असलेले रुग्ण कोठेच आढळलेले नाहीत त्यामुळे नागरिकांनी निश्चिंत रहावे, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले आहे.

मंकी पॉक्सची लक्षणे…

कोरोना महामारीच्या काळात म्हणजे सन 2022 मध्ये मंकी पॉक्सचे रुग्ण देशात आढळले. थंडी वाजून ताप येणे, अंग दुखणे, लघवी व शौचास त्रास होणे, अंगावर पुरळ उठणे ही या तापाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे असलेले रुग्ण आढळल्यास शासकीय रुग्णालयात रक्त तपासणी करून निदान करता येते. या तापाच्या रुग्णांवर तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे. अशी लागण झालेल्या रुग्णांच्या माध्यमातून इतरांमध्ये संक्रमणाची भीती असते. त्यामुळे खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोना संसर्गासारखेच बाधित रुग्णाचे कपडे, बिछाना, वापरलेल्या वस्तूंमधून या आजाराचा प्रसार होतो. त्यामुळे रुग्णाला अलगीकरणमध्ये ठेवणे चांगले.

सध्या जिल्ह्यात गेले महिनाभर पावसाळी हवामान आहे. त्यामुळे तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. अंगदुखी व ताप ही सामान्यता व्हायरल लक्षणे दिसून येत आहेत. कोणताही ताप अंगावर काढू नका तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *