सोलापूर : शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शाळांची पडताळणी सुरू झाली आहे.
अल्पसंख्यांक शाळांमधील विद्यार्थ्यांबाबत यापूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पट पडताळणी करण्यात आली होती. आता शालेय शिक्षण विभागाने अल्पसंख्याक संस्थांची सर्वच माहिती मागवली आहे. अल्पसंख्यांक संस्थांच्या सुरू असलेल्या शाळांबाबत डॉक्युमेंट फॉरमॅटमधून कागदपत्राची पडताळणी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 147 अल्पसंख्यांक संस्था आहेत. इतक्या संस्था असल्या तरी त्यांच्या शाळांच्या शाखा बऱ्याच आहेत. धार्मिक व भाषिक या दर्जावर या संस्थांना अल्पसंख्यांक असा दर्जा मिळाला आहे. सन 2007 नंतर अल्पसंख्यांक दर्जा मिळालेल्या शाळांची पडताळणी करण्यात येत आहे. त्या शाळांच्या संस्थांची कमिटी अस्तित्वात आहे काय? विद्यार्थी संख्या किती आहे? असे दहा मुद्दे विचारात घेण्यात आले आहेत. बोगस संस्था काढून अनुदान लाटण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. तसेच विद्यार्थी संख्या कमी असतानाही कर्मचारी संख्या अधिक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही पडताळणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पडताळणी झाली सुरू…
शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शाळांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी दिली. यासाठी संबंधित शाळांचा कॅम्प घेऊन कोणती माहिती सादर करावयाची याचे सर्व मुद्दे मुख्याध्यापकांना पटवून सांगण्यात आले आहेत. त्यानुसार शाळांचे प्रस्ताव येत आहेत.