सोलापूर : मुख्यमंत्री वयोश्री योजना व तीर्थ दर्शन योजनांचा लाभ जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघांनी सहकार्य करण्याचे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले असल्याची माहिती फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे सचिव हनुमंत कुंभार गुरुजी यांनी सांगितली.
मुख्यमंत्री वयोश्री व तीर्थ दर्शन योजनेचा आढावा घेण्यासाठी शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत झालेले बदल, लागणारी कागदपत्रे तसेच तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी निवडणे,त्यासाठी लागणारी कागदपत्रे ,नियम व अटी, पात्र- अपात्रतेचे निकष याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठांनी या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य समाज कल्याण कार्यालयाकडून दिले जाईल असे आश्वासन दिले. या योजनेच्या जाचक अटी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी डॉ चन्नय्या स्वामी, हनुमंत कुंभार, जयकुमार काटवे ,श्रीकांत बोराडे यांनी केली. या बैठकीसाठी सोलापूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष हनुमंत कुंभार गुरुजी, शहराध्यक्ष गुरुलिंग कन्नूरकर, जयकुमार काटवे, संजय जोगीपेठकर, मन्मथ कोनापुरे, अशोक खानापुरे, नागेश कुंभार, नवनाथ कदम,संगेपाक, घनश्याम दायमा, बागल आदी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीचे संपूर्ण नियोजन प्रथमेश बिराजदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.
या बैठकीला उपस्थित असलेल्या 25 ज्येष्ठांनी तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज नेले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठांची उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख आहे. तसेच तीर्थाटनला जाण्यासाठी ज्येष्ठांनी आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. वयोश्री योजनेतून 3 हजाराचे अनुदान दिले जाते. यातून ज्येष्ठांना श्रवणयंत्र, वाकर, टॉयलेट खुर्ची खरेदी करता येणार आहे.