सोलापूर : माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांच्या बेडा जंगम जातीच्या दाखल्याबाबच्या तक्रारीवरील सुनावणीला आत्तापर्यंत गैरहजर राहिल्याने जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांनी येत्या बुधवारी हजर राहण्याबाबत त्यांना नोटीस जारी करण्याचे आदेश दिले आहेत.
सोलापूर जात पडताळणी समितीचे अध्यक्ष पवार, सदस्य शिंदे, कवले व विधी तज्ञ शिवलकर यांच्यासमोर माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या बेडा जंगम जातीच्या दाखल्याबाबत सुनावणी सुरु आहे. तक्रारदार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, भरत कनकुरे यांनी उपस्थित झालेल्या पुराव्यावर मुद्दे मांडले व आक्षेप घेतला. अक्कलकोट तहसीलमधील जात पडताळणी दाखल्या संदर्भात तक्रारदारांनी युक्तिवाद केला. या दाखल्याबाबत तहसीलदाराने दिलेले उत्तर व लॅबच्या अहवालात शाईमध्ये व शब्दांमध्ये बदल असल्याचे नमूद केल्याचे त्यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे हा दाखला रद्द करावा अशी मागणी कनकुरे यांनी केली. उमरगा तहसीलचे नायब तहसीलदार अमित भारती यांनी जातीच्या दाखल्याचे सादर केलेल्या नोंदणी रजिस्टरवर आक्षेप घेण्यात आले . 80 वर्षांपूर्वीचे अडीचशे जातीच्या नोंदी असणारे रजिस्टर करकरीत कसे? असा सवाल मुळे आणि कनकुरे यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे इतक्या नोंदीमध्ये फक्त एकट्या महाराजांच्या नाते संबंधित जातीचा उल्लेख कसा? हे रजिस्टर 80 वर्षापूर्वीचे असू शकत नाही असा मुद्दा मांडला. त्यावर पडताळणी समितीचे अध्यक्षांनी हा पुरावा वगळण्याचे मान्य केल्याचे कनकुरे यांनी सांगितले.
तक्रारदार मुळे यांनी समितीच्या या सुनावणीला हरकत घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने दहा ऑगस्टपर्यंत सुनावणी संपवून अहवाल सादर करण्याबाबत सूचित केले होते. मुदत संपल्यानंतर सुनावणीचे कामकाज कसे काय असा त्यांचा सवाल होता. त्यावर समितीने 10 ऑगस्टपर्यंत कामकाज संपवा असे म्हटले आहे. त्यानंतर कामकाज करू नका असे थोडेच बंधन घातले आहे. ठोस पुराव्यासाठी आम्ही सुनावणी घेत असून याबाबत सविस्तर अहवाल न्यायालयाला सादर करणार असल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंतच्या सुनावणीला महाराज गैरहजर राहिले आहेत. पुढील सुनावणीला त्यांना हजर राहण्याबाबत सूचना करावी, अशी विनंती करण्यात आली. त्यावर समितीने महाराजांना येथे बुधवारी सुनावणीला हजर राहण्याबाबत नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत.