सोलापूर : अक्कलकोटपासून माझ्या नोकरीच्या करिअरची सुरुवात झाली. पंढरपूरची आषाढी वारी करण्याचे भाग्य मला मिळाले. झेडपीच्या एक वर्षाच्या कारकिर्दीतच मला सोलापूर जिल्ह्याची मांदियाळी अनुभवता आली. शिस्त, कडक स्वभाव, सातत्याने तुम्हाला ओरडणे, करायचं आहे, झालंच पाहिजे, असा माझा लकडा असायचा.  मी तशा स्वभावाची नाही. मी काय काम केलं व मी कोणासाठी काम केलं हे महत्त्वाचे आहे. माझं काम लोकाभिमुख आहे. मी ज्या संस्थेत काम करते ती लोकांसाठी आहे. माझ्या आधी विस्कटलेली घडी होती, हे सगळ्यांना माहित आहे. त्यामळे झेडपीत राबवलेली कडक शिस्त ही माझी पॅशन होती. त्यामुळे माझा डावा आणि उजवा कोणीच नव्हता. चांगलं प्रशासन राबवण्यासाठी हे करावंच लागतं. माफी मागते तुम्हा सर्वांची, कामाचा तो भाग होता. तुम्ही ते शब्द, ते बोलणं, स्वतःला कधीच दुखावून घेऊ नका, अशा शब्दात जिल्हा परिषदेच्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी निरोप घेतला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे यांची पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी बुलढाण्याचे सीईओ जिल्हा परिषदेत येऊन पदभार घेतला. पदभार घेतानाच जंगम यांनीही शिस्तीचे दर्शन घडविले. बरोबर दहा वाजता म्हणजे कामाच्या वेळेतच ते जिल्हा परिषद येथे हजर झाले. त्यानंतर आव्हाळे यांनी कार्यालयात येऊन त्यांना पदभार दिला. त्यानंतर त्यांनी विभाग प्रमुखांची  ओळख आढावा बैठक घेतली.

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात जंगम यांचे स्वागत व आव्हाळे यांचा निरोप समारंभ झाला. प्रशासनाच्या उपमुख्य  कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कर्मचारी संघटनेच्यावतीने अविनाश गोडसे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका वैद्यकीय अधिकारी बोधले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, महिला बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची भाषणे झाली.

निरोपावेळी मनीषा आव्हाळे भावुक झाल्या. दोन वर्ष प्रांत म्हणून काम केल्यावर एक वर्ष जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या काळात ग्राउंडवर जाऊन काम करता आले. त्यामुळे सोलापूर जिल्हा समजला. शालेय पोषण आहारासाठी उत्तम स्वयंपाक घर, स्मार्ट अंगणवाडी, ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यांसाठी निदान प्रोजेक्ट असे उपक्रम हाती घेतले. माळशिरस, पंढरपूर व मोहोळ पंचायत समितीत जाऊन सुनावण्या घेतल्या. त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांसमवेत मिसळून काम करता आले. यामुळे या कामाचे सगळे श्रेय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे. महिला कर्मचाऱ्यांनी माझ्याशी मोकळेपणाने संवाद साधला. त्यांनी मांडलेली एक समस्या मी सोडवू शकलेले नाही. याची खंत वाटते. एक वर्षाचा कालावधी कमीच होता अनेक मनात इच्छा असूनही त्या पूर्ण करता आल्या नाहीत.

जूनमध्येच बदली होणार होती…

सीईओ आव्हाळे म्हणाल्या, माझी बदली जून मध्येच होणार होती पण त्याच वेळी आषाढी वारी आली त्यामुळे माझी बदली थांबली. मला वारीचा अनुभव घेता आला. मी वारकरी कुटुंबातून आले आहे. माझे आजोबा वारी करायचे. त्यामुळे प्रत्यक्षात मला वारी अनुभवता आली. वारीचा अनुभव अलौकिक होता. माझ्यापेक्षा माझ्या टीमने मोठं काम केलं. म्हणून कौतुक माझं नाहीच. यशवंत पंचायतराज अभियानात प्रथम आल्यावर त्यावेळेस मला वाटलं आता आपण जायचं, अन तसंच झालं.

अभियान सुरूच राहणार…

सीईओ मनीषा आव्हाळे यांनी झेडपीत लावलेली शिस्त व सुरू केलेले नवीन अभियान कायम पुढे सुरूच राहतील अशी ग्वाही नूतन सीईओ कुलदीप जंगम यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक लिंगराज यांनी केले तर शेवटी जिल्हा विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *