सोलापूर : ठेवीदारांस फसविल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल असलेले गणेश फायनान्स व संत सेवालाल निधी बँकेचे शिवाजी जाधव गुरुजी व त्यांचा मुलगा सचिन जाधव याच्यासह जावई सचिन चव्हाण व कुटुंबातील अन्य तिघा विरोधात मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शीलवंत राऊतराव (रा. कंदलगाव) यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार मंद्रूप पोलिसांनी संत सेवालाल निधी बँक आणि गणेश फायनान्सचे माजी मुख्याध्यापक शिवाजी जाधव, त्यांची पत्नी सुनीता, मुलगा सचिन, सून पूजा, सचिन किशन चव्हाण आणि त्याची पत्नी सुजाता सचिन चव्हाण या सहा जणाविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीलवंत यांच्यासह 45 जणांची या सहा जणांनी दोन कोटी बारा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव गुरुजी व त्यांच्या साथीदारांनी या ठेवीदाराकडून बँक व फायनान्ससाठी ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून ठेव घेतली. त्यानंतर मुदत पूर्ण झाल्यावर ठेव व व्याजाची मागणी केल्यावर देण्यास टाळाटाळ केली. याबाबत यापूर्वी सदर बाझार पोलिस ठाण्यातही जाधव गुरुजी व बँकेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात जाधव गुरुजी व त्याचा मुलगा सचिन यांना अटक झाली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात जाधव गुरुजीचा जावई आरोपी नव्हता. त्यामुळे तो बिनधास्तपणे फिरत होता. पण बँकेचे कार्यक्षेत्र मंद्रूपमध्ये असल्याने उर्वरित ठेवीदारानी मंद्रूप पोलीस ठाण्यात धाव घेतली.
आरोपीचे उंची राहणीमान…
सदर बाझार पोलीस ठाण्यात जाधव गुरुजी व त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि बँकेच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे जावई सचिन चव्हाण हा बिनधास्त होता. थारमधून त्याचे फिरणे सुरूच होते. सासू-सासर्याच्या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे तो सगळ्यांना सांगत होता. पण त्याच्याकडे अत्याधुनिक जीप, मंद्रूपमध्ये पेंटचे दुकान, सोलापुरात मोठ्या अपार्टमेंटमध्ये आलिशान फ्लॅट, वडकबाळला शेती अशी संपत्ती कोठून आली. त्याच्या उत्पन्नाचे साधन काय? असे सवाल ठेवीदारानी उपस्थित केले. घोटाळ्याचा सूत्रधार, माजी मुख्याध्यापक जाधव गुरुजी याने पद्धतशीरपणे ही गुंतवणूक मुली व जावयाच्या नावे केल्याचा आरोप होत आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पदभार घेतल्यावर हे प्रकरण त्यांच्यासमोर आले. त्यांनी तात्काळ जावयालाही यात आरोपी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे मंद्रूप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे…
सेवालाल निधी बँक व गणेश फायनान्सचा सूत्रधार जाधव गुरुजी व त्याच्या कुटुंबीयाविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला असला तरी फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने तपासासाठी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप हे या प्रकरणाचा आता तपास करणार आहेत. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जाधव गुरुजी व त्याच्या टीमविरुद्ध कडक कारवाई केल्याने ठेवीदारांमधून समाधानाचे वातावरण पसरले आहे.
सदर बझार ठाण्यात असा आहे गुन्हा
संत सेवालाल निधी बँकेच्या ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 589/2024 अन्वये BNS चे कलम 316(2), 318(3), 318(4) व महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियमचे कलम 3 नुसार शिवाजी जाधव, पत्नी सुनीता जाधव, मुलगा सचिन जाधव, सून पुजा जाधव, मुलगी सुजाता चव्हाण, सीमा शाह, मधुबेन पटेल व अर्चना देशपांडे यांचेविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी शिवाजी जाधव व सचिन जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत योगेश पवार यांनी फिर्याद दिली आहे. दि. 12 सप्टेंबर 2022 रोजी योगेश पवार यांनी संत सेवालाल निधी बँकेत प्रति महिना एक टक्क्यांच्या परतावा हमीवर 50 हजार रुपयांची एफ.डी ठेवली होती. परंतु, डिपॉझिटनंतर शिवाजी जाधव व संचालकांनी, एक टक्क्याप्रमाणेचा परतावा एकदाही दिला नाही. व मुदतपूर्व एफ.डी मोडून एफ.डी.चे व परताव्याचे पैसे परत मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे देवून पैसे देण्यास टाळाटाळ केली. संत सेवालाल निधी बँकेच्या संचालकांनी डिपॉझिटच्या रक्कमेतून गणेश फायनान्समार्फत स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कर्जे वाटली. योगेश पवार यांचे 50 हजार रुपये डिपॉझिट व त्यावरील 22 महिन्याचा 11हजार रुपये परतावा असे एकूण 61हजार रुपये इतकी रक्कम दिली नाही. तसेच ठेवीच्या पैश्याचा गैरव्यवहार करून ठेवीदारांची फसवणूक केल्याची फिर्याद योगेश नागनाथ पवार यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लकडे करीत आहेत.