सोलापूर : माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांच्या बेडा जंगम जातीच्या दाखल्याबाबच्या तक्रारीवरील सुनावणीला आत्तापर्यंत गैरहजर राहिल्याने जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांनी बुधवार दि. 4 सप्टेंबर रोजी सुनावणीला हजर राहण्याबाबतची काढलेली नोटीस मिळाली नसल्याची कैफियत त्यांच्या वकिलांनी समितीसमोर हजर राहून मांडली.
सोलापूर जात पडताळणी समितीचे अध्यक्ष पवार, सदस्य शिंदे, कवले व विधी तज्ञ शिवलकर यांच्यासमोर माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या बेडा जंगम जातीच्या दाखल्याबाबत सुनावणी सुरु आहे. तक्रारदार मिलिंद मुळे, भरत कनकुरे यांनी सुनावणीला माजी खासदार ड्रॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी सुनावणीला हजर राहत नसल्याबद्दल तक्रार केली होती. यावर अध्यक्षांनी महास्वामी यांना सुनावणीला हजर राहण्याबद्दल नोटीस काढली होती. यावर गुरुवारी माजी खासदार महास्वामी यांच्यातर्फे एडवोकेट खोले व त्यांचा पुतण्या योगेश हिरेमठ हे हजर झाले. जात पडताळणी समितीने महास्वामी यांना पोस्टाद्वारे पाठवलेली नोटीस अद्याप मिळाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोस्टाचा विलंब मान्य करून समितीच्या अध्यक्षांनी महास्वामी यांनी उच्च न्यायालयात मांडलेल्या आठ मुद्द्यावर हो नाही याचे उत्तर द्यावे सूचना केली. त्यावर वकिलानी न बोलता महाराज गौडगावला असतात. समितीची नोटीस मिळाल्यावर हजर करतो. पण त्यांचा उलट तपास घेऊ नये अशी विनंती केली. त्यावर तक्रारदार कनकुरे यांनी उच्च न्यायालयात तुम्हीच आठ मुद्दे मांडलेले आहात. त्या मुद्द्याचे स्पष्टीकरण आम्हाला हवेच आहे. त्यामुळे आम्ही उलट तपास घेणारच असे म्हणणे मांडले. तसे पाहिले तर सुनावणीच्या वेळेला आम्ही जात पडताळणी संदर्भात तुम्ही सादर केलेले सर्व पुरावे खोडून काढलेले आहेत. जातीच्या दाखल्या संदर्भात ग्रह चौकशीची ही मला गरज वाटत नाही. मी बेडा जंगम जातीच्या अध्यक्षांकडून सर्व माहिती आणलेली आहे. बेडा जंगम हे कुटुंब यवतमाळ नांदेड परिसरात आहेत. येथील 97 कुटुंब सोलापुरात आली आहेत. त्यांची यादी माझ्याजवळ आहे. त्यामुळे महास्वामी यांचा बेडा जंगम जातीचा दाखला खोटा आहे, हे त्यांनी सादर केलेल्या पुराव्यावरूनच दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या मुद्द्यावर त्यांनी उत्तरे दिलीच पाहिजेत अशी मागणी केली.तक्रारदार मुळे यांनीही आम्ही मुद्द्यावर क्रॉस घेणारच असे स्पष्ट केले. त्यावर अध्यक्षांनी सोमवारपासून यावर दररोज सुनावणी घेतली जाईल, महास्वामी यांना हजर ठेवा असे आदेश दिले.