सोलापूर : ठेवीदारांस फसविल्याप्रकरणी सदर बझार व मंद्रूप पोलिसांत गुन्हा दाखल असलेले गणेश फायनान्स व संत सेवालाल निधी बँकेचे शिवाजी जाधव गुरुजी यांनी नेमका घोटाळा कितीचा केला याबाबत शिक्षक दिनी चर्चा सुरू आहे.
शीलवंत राऊतराव (रा. कंदलगाव) यांनी मंद्रूप व योगेश पवार यांनी दिलेल्या फिर्याद्रीवरून मंद्रूप व सदर बझार पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. संत सेवालाल निधी बँक आणि गणेश फायनान्सच्या माध्य्यमातून माजी मुख्याध्यापक शिवाजी जाधव, त्यांची पत्नी सुनीता, मुलगा सचिन, सून पूजा, सचिन किशन चव्हाण आणि त्याची पत्नी सुजाता सचिन चव्हाण या सहा जणांनी शीलवंत यांच्यासह 45 जणांची दोन कोटी बारा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव गुरुजी व त्यांच्या साथीदारांनी या ठेवीदाराकडून बँक व फायनान्ससाठी ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून ठेव घेतली. त्यानंतर मुदत पूर्ण झाल्यावर ठेव व व्याजाची मागणी केल्यावर देण्यास टाळाटाळ केली. याबाबत यापूर्वी सदर बाझार पोलिस ठाण्यातही जाधव गुरुजी व बँकेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात जाधव गुरुजी व त्याचा मुलगा सचिन यांना अटक झाली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
या प्रकरणात जाधव गुरुजीनी नेमका घोटाळा किती केला याबाबत ठेवीदारांमध्ये वेगवेगळी चर्चा आहे. खरे तर फायनान्स मध्ये येण्यापूर्वी जाधव गुरुजी मंद्रूप पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. मंद्रूप झेडपी शाळेचे रेकॉर्ड अध्ययावत केले. विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष दिल्यामुळे अनेक पालकांच्या तोंडी ते चर्चेत होते. पण नंतर फायनान्स चा नाद लागला आणि गुरुजी बिघडले असे पालकांमध्ये चर्चा रंगली आहे. आज शिक्षक दिन असल्यामुळे जाधव गुरुजींच्या घोटाळ्याच्या चर्चेला उधाण आले आहे. गुरुजींनी नेमका घोटाळा किती केला? याबाबत लोकांमध्ये आता पैजा लागू लागल्या आहेत. गुरुजीने 14 कोटी पर्यंत घोटाळा केल्या असल्याचे आता सांगितले जात आहे. अद्याप अनेक ठेवीदारांनी तक्रारी दिलेल्या नाहीत. जानेवारीपासून या घोटाळ्याची चर्चा सुरू होती. काळजी करू नका मी रिटायर होत आहे त्याचे पैसे येणार आहेत पहिला तुम्हालाच पैसे देतो असे त्यांनी सर्वांना सांगितले होते. पैसे मागणाऱ्यांना तुम्ही पोलिसात जाऊ नका मी तुम्हाला पैसे देणारच आहे. माझी येणे बाकी मोठी आहे पैसे वसूल करतो तुम्हाला देतो असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. रिटायरची तारीख पुढे असतानाच आधीच त्यांनी निरोप समारंभ घेतला. त्यामुळे गुरुजी पैसे परत देतील असा अजूनही काही जणांना विश्वास आहे. त्यामुळे घोटाळ्याचा आकडा अजून वाढलेला नाही. जसजसे तक्रारदार समोर येतील तसतसे हा आकडा वाढत जाईल असेही आता सांगितले जात आहे. पण काही झाले तरी गुरुजीने हे चांगलं केले नाही. लोकांचा पैसा बुडवायला नको होता अशी चर्चा आता रंगली आहे.