सोलापूर : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल असलेले गणेश फायनान्स व संत सेवालाल निधी बँकेचे शिवाजी जाधव गुरुजी यांची पत्नी सुनीता व सून पूजा या दोघी हैदराबादला पळून जाण्याच्या तयारीत असताना सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना शिताफीने गुरुवारी दुपारी अटक केली.
योगेश पवार (रा. धुम्मावस्ती, सोलापूर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संत सेवालाल निधी बँक आणि गणेश फायनान्सचे संचालक शिवाजी जाधव, त्यांची पत्नी सुनीता, मुलगा सचिन, सून पूजा व इतर संचालकांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील फसवणुकीचा आकडा वाढल्याने प्रकरण सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 75 जणांची 4 कोटी 76 लाखाची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. जाधव गुरुजी व त्यांच्या मुलगा सचिन (दोघे रा. मंद्रूप, ता. दक्षिण, सोलापूर ) या दोघांना यापूर्वीच सदर बझार पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कोठडीनंतर या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
प्रकरण पुढील तपासासाठी शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. मुख्य सूत्रधार जाधव गुरुजी याची पत्नी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याचे दिसून आल्यावर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. ती सुनेसह हैदराबादला निघून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी गुरुवारी दुपारी हैदराबाद नाक्याजवळ दोघींना ताब्यात घेतले. सुनिता शिवाजी जाधव ( वय : 52), पूजा सचिन जाधव ( दोघी रा. 12/2, साफल्यनगर, सैफुल, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उप आयुक्त डॉ. दिपाली काळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, हवालदार काशिनाथ धारसंगे, पोलीस शिपाई राजेश पुणेवाले, सदर बझार पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई स्नेहा किनगी, जे. एन. गुंड, चालक परशुराम लांबतुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.