सोलापूर : जिल्हा परिषदेचा कारभार हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह सर्व आमदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतच्या कामकाजात असे कधीच घडलेले नाही. जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींची रेलचेल असते. पण यंदा असे प्रथमच घडले आहे. निमंत्रण देऊन व्यासपीठावर शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता. ही शिक्षण विभागाची चूक की सीईओ कार्यालयातील समन्वयाचा अभाव? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. लोकप्रतिनिधींचे सर्व प्रोटोकॉल माहित असलेले सीईओंचे पीए कार्यरत असणे अपेक्षित आहे. पण गेल्या दोन वर्षात लोकप्रतिनिधींच्या प्रोटोकॉलला हरताळ फासला गेला. अधिकाऱ्यांच्या हट्टासाठी पीएची नियुक्ती करण्यात आली. नियुक्त झालेल्या पीएनी सर्वांशी समन्वय ठेवणे आवश्यक होते. पण हे पीए आपल्या कक्षातून हललेच नाहीत. शहरातील दोन आमदार सोडले तर जिल्ह्यातील आमदारांची झेडपीचा संबंधच आला नाही. लोकप्रतिनिधी व सीईओ यांच्यात समन्वय घडवण्याची जबाबदारी पीएची असते. पण नवनियुक्त पीएनी हे संबंध प्रस्थापित केले नसल्याचे ठळकपणे दिसून येत आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानंतर प्रशासकराज सुरू झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व विषय समितीचे सदस्य आमदार झाले. जिल्हा परिषद विषय समितीचे सभापती व सदस्यांचे अधिकार आमदारांकडे गेले. त्यामुळे जिल्हा परिषदेत होणाऱ्या विषय समिती व सर्वसाधारण समितीच्या सभेला आमदाराची उपस्थिती राहणे बंधनकारक आहे. पण गेल्या दोन वर्षात हे चित्र दिसलेच नाही. सर्वसाधारण सभेला आमदारांना निमंत्रित केले गेले की नाही हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आमदारांचा झेडपीशी संबंध तुटत गेला. जिल्हा परिषदेच्या गेल्या वर्षभरातील कारभाराविषयी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेही नाराज होते. त्यामुळे शिक्षक दिनाचा इतका मोठा कार्यक्रम असतानाही पालकमंत्र्यांनीही या कार्यक्रमाला पाठ फिरवल्याचे दिसून आले. कार्यक्रमाबाबत समन्वय ठेवायची जबाबदारी कोणाची होती? आमदारांना कार्यक्रमाच्या स्मरणाबाबत फोन गेले का? सीईओच्या पीएला जिल्ह्यातील किती आमदार थेट ओळखतात? झेडपीचे यापुढील कार्यक्रम असेच होणार का? याबाबत खुद्द सीईओ कुलदीप जंगम यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. मागील काळात कारभार कसा चालला? सर्वांशी कोणाचा संपर्क होता? सीईओचा कारभार पारदर्शी व लोकाभिमुक कोणामुळे झाला? हे पाहणे आता गरजेचे झाले आहे.
झेडपीची ही प्रसिद्धी यंत्रणा…
जिल्हा परिषदेचे कार्यक्रम व योजनांविषयी माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे तसेच झेडपीच्या कार्यक्रमाचे फेसबुक पेजवरून प्रसिद्धीकरण केले जाते. सीईओ कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेचे फेसबुक पेज उघडून बघितल्यानंतर त्यांना प्रसिद्धी यंत्रणा कितपत तत्पर आहे हे दिसून येईल. झेडपीच्या यंत्रणेतील त्रुटींचे बारकावे हेरून सीईओपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी विभागप्रमुखांबरोबरच पीएची आहे. मावळत्या सीईओंना लोकप्रतिनिधी व लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची कारणे कोणती आहेत? याचाही शोध होणे गरजेचे आहे. सीईओ कुलदीप जंगम यांनी कारभार हाती घेतल्यापासून प्रत्येक विभागाची बारकाईने माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्याच कक्षातून निसटणाऱ्या या छोट्या गोष्टींविषयी त्यांना कल्पना यावी या उद्देशातून या मालिकेचा हा छोटासा भाग आहे.
उद्या वाचा…
“माध्यमिक’चे वाटोळे कोणी केले?