सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चार पीए आहेत पण एकही कामाचा नसल्याची स्थिती दिसत आहे. अचानकपणे मोर्चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनावर चालून येत आहेत अन मोर्चेकरांना तोंड देताना सीईओंची धांदल उडताना चित्र दिसत आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चार पीए आहेत. यापूर्वीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या पीएची नियुक्ती केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सुधाकर माने- देशमुख हे काम पाहतात. सीईओंच्या भेटीगाठी, दररोजचे दिनक्रम व विभाग प्रमुखांशी समन्वय, अभ्यंगताची माहिती, कार्यालयात बाहेर चाललेल्या घडामोडींची माहिती देणे ही या पीए यांची जबाबदारी आहे. तलवार हे दुसरे स्वीय सहायक म्हणून काम पाहतात. मेल वरील पत्रे तपासून सीईओंकडे प्रिंट पाठवणे, सीईओकडून दिलेली उत्तरे पाठवणे, स्वीकारलेले निवेदने संबंधित विभाग प्रमुखांना पाठविणे ही त्यांची जबाबदारी आहे. आत्तापर्यंतच्या सीईओनी अशा पद्धतीने कामकाज करून घेतले आहे. मावळते सीईओ मनीषा आव्हाळे यांनी शॉर्ट हॅन्ड टायपिंग नसलेले पीए नाहीत म्हणून नदाफ यांची नियुक्ती केली. ऑनलाइन कारभार नदाफ यांच्याकडून करून घेण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नदाफ यांच्यावर एक विशेष जबाबदारी देण्यात आली होती. विभाग प्रमुख व इतर अधिकारी दररोज कार्यालयात हजर असतात का नाही याची हजेरी नदाफ हे घेत असतात असे सांगण्यात येत आहे. सीईओ आव्हाळे यांनी जाता जाता चौथा पीए म्हणून जाधव यांची नेमणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. शॉर्टहँड टायपिंग येत असलेले व शासन नियमानुसार ही नियुक्ती असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दिमतीला चार पीए मिळाले. पण जिल्हा परिषदेतील गोंधळ वाढतच गेला. सीईओंच्या केबिनची मोडतोड झाली. लोकप्रतिनिधींना ताटकळत ठेवण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेवरील रोष वाढत चालला आहे. यापूर्वीचे सीईओ एका पीएवर अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करीत असताना गेल्या तीन वर्षात प्रशासकराज काळात तीन पीए नव्याने आले. पण जिल्हा परिषदेच्या कामकाजात कितपत सुधारणा झाली हे न सांगितलेले बरे.
सीईओचे खास पीए म्हणून दिलीप स्वामी यांच्या कार्यकाळात शिवानंद मगे यांची नियुक्ती करण्यात आली. पण नंतर मगे यांना कामकाज जमलेच नाही. त्यानंतर सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतला. चांगला पीए पाहिजे म्हणून त्यांनी प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेऊन सुधाकर माने- देशमुख यांची पीए म्हणून निवड केली. पण माने यांच्या निवडीलाही विरोध झाला. तरीही विरोधाला न जुमानता कामकाज सुरू ठेवण्यात आले. प्रशासक राज सुरू असताना माजी पदाधिकाऱ्यांना सन्मान देण्यात अडचणी आल्या. त्यामुळे माजी पदाधिकाऱ्यांची प्रशासक राजवटीतील कारभारावर नाराजी वाढत गेली. पीएवर असलेली दुसरी जबाबदारी म्हणजे पदाधिकारी यांच्यात समन्वय राखणे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कामकाजाची चांगली प्रसिद्धी यंत्रणा राबवणे. माध्यम प्रतिनिधींची समन्वय ठेवून सीईओनी जिल्हा परिषदेच्या विकास कामकाजासंबंधी राबवलेल्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करणे. हे काम माने देशमुख यांना जमलेच नाही. त्यामुळे मावळते सीईओ मनीषा आव्हाळे यांनी चार प्रसिद्धी प्रमुख नेमले. पण एकालाही ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडता आलेली नाही. वास्तविक यापूर्वी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली होती. त्यानंतर याच कार्यालयातील सोनवणे यांना ही जबाबदारी देण्यात आली पण त्यांच्याकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे हे काम प्रभावीपणे झाले नाही. त्यामुळे सीईओना पीएना सांभाळण्यातच वेळ मारून न्यावी लागली. जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुलदीप जंगम यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पीए हटावची ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांना हा विषय गांभीर्याने घ्यावाच लागेल अन्यथा भविष्यात जिल्हा परिषदेच्या कारभाराचे नुकसान होणार असल्याची भीती माजी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.