सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने स्थानिक व तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाल केलेल्या बीडीओ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात करमाळ्याचे बीडीओ मनोज राऊत व मोहोळचे आनंद मिरगणे आणि दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीचे बीडीओ बाळासाहेब वाघ यांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेला मोठा फटका बसला आहे. जिल्हा परिषदेचे नाव राज्यभर करणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांची इतर जिल्ह्यात बदली झाली आहे. त्यात करमाळ्याचे बीडीओ मनोज राऊत यांचा समावेश आहे. शासकीय योजना जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यात त्यांचा हातखंडा होता. जिल्हा परिषदेने राबवलेली महिला आरोग्य तपासणी मोहीम असो वा झेड पी शाळांचे अत्याधुनिक किचन शेड, पोषण आहार, पाणीपुरवठा योजनांचा स्वतः जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून यंत्रणा उभी करण्यावर भर देणारे ते एकमेव अधिकारी ठरले आहेत. घरकुल योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत तत्कालीन सीईओनी माळशिरसचे बीडीओ गुळवे निवृत्त झाल्यावर तेथील अधिकचा पदभार दिला होता. दोन्ही ठिकाणी त्यांनी सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून काम केले.
मोहोळचे बीडीओ आनंद मिरगणे हे अत्यंत तरुण आणि तडफदार वृत्तीने काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मोहोळ पंचायत समिती क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. या दोघांची धाराशिव जिल्ह्यात बदली झाली आहे.
दक्षिण सोलापूरचे बीडीओ बाळासाहेब वाघ यांचीही बदली लातूर जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे. त्यांच्याजागी साताऱ्याच्या अर्चना वाघमळे यांची नियुक्ती झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात घरकुल व इतर योजना राबविण्यासाठी वाघ यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत अनेक वर्षापासून असलेल्या अनेक क्लिष्ट प्रकरणे त्यांनी मार्गी लावली. जिल्हा परिषद मुख्यालयातील अनेक जबाबदाऱ्या त्यांना वेळोवेळी देण्यात आल्या. त्यामध्ये नुकतीच झालेली पदभरतीतील परीक्षा केंद्र व कागदपत्र तपासणीची जबाबदारी त्यांनी वेळेत पार पाडली. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालयात वाघ यांची मोठी प्रतिमा आहे. जिल्हा परिषदेसाठी अत्यंत तळमळीने काम करणाऱ्या या तीन अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सीईओ कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे इशाधीन शेळकंदे स्वच्छता विभागाचे अमोल जाधव यांनी त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.