जिल्हा परिषदसोलापूर

सीईओ जंगम यांनी काढला १५ नंबर अन ठेकेदाराला लागली ५ लाखाची लॉटरी

झेडपीच्या बांधकाम विभागातर्फे काढण्यात आली सुभे व मजूर सोसायटीसाठी लॉटरी

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी डब्यात हात घालून १५ नंबर काढला अन मंगळवेढ्याच्या ठेकेदाराला पाच लाखाच्या कामाची लॉटरी लागली आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फे सुभे आणि मजूर सोसायटीसाठी कामे मंजूर करण्यासाठी मंगळवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात लॉटरी सोडत काढण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी, ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. पहिल्यांदा सुभेसाठी लॉटरी काढण्यात आली. यात 99 लाखाच्या 15 कामांसाठी 309 जणांनी सहभाग नोंदवला. यात सर्व कामाची लॉटरी काढण्यात आली.

त्यानंतर मजूर सोसायटीसाठी लॉटरी पद्धत राबविण्यात आली. यात 61 लाखाच्या दहा कामासाठी 78 जण सहभागी झाले होते. आठ कामाची लॉटरी काढण्यात आली. दोनजण अनुपस्थित असल्याने ही कामे रद्द झाली. सुभेसाठी काढण्यात आलेल्या शेवटच्या लॉटरीची सोडत मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्याहस्ते करण्यात आली. त्यात 1५ नंबरचे काम मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील लालसाब मशिदीसमोर सभामंडप बांधण्याचे पाच लाखाचे काम अमृत कनुरे (रा. शनिवार पेठ, मंगळवेढा) यांना मिळाले. सुभे व मजूर सोसायटीच्या लॉटरीसाठी सुमारे एक कोटी साठ लाखाची कामे वाटप करण्यात आली. यात सभामंडप, रस्ते, शाळा दुरुस्तींच्या कामांचा समावेश आहे. बऱ्याच दिवसानंतर लॉटरी काढण्यात आल्याने ठेकेदार संघटनेचे मिलिंद भोसले यांनी समाधान व्यक्त केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी पदभार घेतल्यापासून दुसऱ्यांदा अशी लॉटरी काढण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा या तालुक्यातीलही सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळण्यासाठी रक्कम वाढविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंगळवेढा येथील वैशाली तोडकरी या अनेक दिवसापासून या लॉटरीमध्ये भाग घेतात पण त्यांना आतापर्यंत काम मिळाले नाही. महिलांसाठी वेगळा कोटा ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुभे व मजूर सोसायटीची लॉटरी यशस्वी करण्यासाठी सहाय्यक मुख्य लेखाधिकारी एम. एम. मुल्ला, वरिष्ठ सहाय्यक दत्ता गुरव, रोहित घुले, विशाल घोगरे, मंगेश शिंदे, सागर शेंडगे, पतंगे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button