झेडपीच्या ग्रामपंचायत विभागाचा पदभार स्मिता पाटील यांच्याकडे
नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होईपर्यंत राहणार पदभार

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचा पदभार प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने बीडीओ तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या नुकत्याच बदलीवर नियुक्ती केल्या. त्यात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांची अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर पंचायत समितीकडे बदली झाली आहे. त्यामुळे त्यांनी नुकताच पदभार सोडला आहे. ग्रामपंचायत विभागाचे रिक्त झालेल्या पदाची अतिरिक्त जबाबदारी प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी स्मिता पाटील यांनी ग्रामपंचायत विभागाचाही अतिरिक्त पदभार घेतला आहे. यापूर्वी त्यांच्याकडे समाजकल्याण, माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार आला होता. ग्रामपंचायत विभागाकडे नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होईपर्यंत पाटील यांच्याकडे हा पदभार राहणार आहे.