बदली रद्दसाठी मनीषा देसाई, इशाधीन शेळकंदे गेले मॅटमध्ये
मॅटच्या निर्णयावर आता या दोघांचे भवितव्य ठरणार

सोलापूर : बार्शीच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्त झालेल्या मनीषा देसाई आणि सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी बदली विरोधात मॅटमध्ये धाव घेतली आहे.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य शासनाने स्थानिक व नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू केल्या आहेत. गेल्या आठवड्यात गटविकास अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांची अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांची बार्शीच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे . सोलापूर व कोल्हापूर जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा गटविकास अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. देसाई यांची लवकरच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती होणार असून पदोन्नतीच्या यादीत त्यांचे नाव अग्रभागी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या अन्यायी व चुकीच्या नियुक्तीच्या विरोधात त्यांनी लागलीच मॅटमध्ये धाव घेतली आहे. मॅट न्यायाधिकरणचा सोमवारी निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शेळकंदे यांनी बदली झाल्याबरोबर सोलापूरचा पदभार सोडला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत विभागाचा पदभार सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. तरीही शेळकंदे यांनीही आता मॅटमध्ये धाव घेतल्याचे सांगण्यात आले.