सोलापूर : शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती निरिक्षक खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या उपस्थितीत सुरू झाल्या असून मुलाखती दरम्यान एका माजी पदाधिकाऱ्याने अंगावर फलक परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
काँग्रेस भवनात विधानसभा मतदारसंघ निहाय इच्छुकाच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. यात सकाळच्या सत्रात सोलापूर शहर उत्तर विधानसभा,सोलापूर शहर मध्य विधानसभा, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. दुपारनंतर ग्रामीण भागातील करमाळा विधानसभा, माढा विधानसभा, बार्शी विधानसभा, मोहोळ विधानसभा, अक्कलकोट विधानसभा, पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा, सांगोला विधानसभा, माळशिरस विधानसभा या मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. मुलाखतीला येताना विधानसभा इच्छुक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन न करता आपले परिचय पत्र व कार्याचा अहवाल, सोबत घेऊन वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष चेतन नरोटे, ग्रामीण कार्याध्यक्ष अँड.नंदकुमार पवार यांनी केले आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघासाठी सध्या चुरस आहे. या मतदारसंघातून युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाबा करगुळे यांनी मुलाखत दिली आहे. मुलाखतीला येताना त्यांनी आपल्या सर्वांगावर लावलेला फलक लक्ष वेधून घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर आगमनावेळी केलेले लक्षवेधी आंदोलन व इतर चार लक्षवेधक आंदोलनाचा त्यांनी या फलकावर उल्लेख केला आहे. काँग्रेस निरीक्षकांना आपल्या कार्याची ओळख अशा वेगळ्या पद्धतीने दाखविण्याचा त्यांचा हा प्रयत्न सर्वांनाच धक्का देणारा ठरला. काँग्रेस भावना त्यांच्या पेहराव्याची चर्चा सुरू होती.