सोलापूर : बार्शीच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्त झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, दक्षिण सोलापूरला नियुक्त झालेल्या गटविकास अधिकारी वाघमळे यांची बदली मॅटने रद्द केली आहे. मॅटने तिघांची बदली रद्द केली असली तरी मात्र इकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांना पदभार घेण्यास अडचण निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य शासनाने स्थानिक व नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू केल्या आहेत. यात गटविकास अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांची अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्ती झाली होती तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांची बार्शीच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. साताऱ्याच्या वाघमळे यांची बदली दक्षिण सोलापूर गटविकास अधिकारी पदी झाली होती.
सोलापूर व कोल्हापूर जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा गटविकास अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या अन्यायी व चुकीच्या नियुक्तीच्या विरोधात पहिल्यांदा देसाई यांनी मॅटमध्ये धाव घेतली. त्यामुळे मॅटने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली. बदली झाल्याबरोबर शेळकंदे यांनी सोलापूरचा पदभार सोडला होता. त्यामुळे ग्रामपंचायत विभागाचा पदभार सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. पदभार सोडल्यानंतर शेळकंदे यांनी मॅटमध्ये धाव घेतली. मॅटने बदली रद्द ठरवत तिघांचा निकाल एकत्र दिल्याचे सांगण्यात आले. देसाई व वाघमळे यांनी पदभार न सोडल्यामुळे ते आहे त्याच पदावर राहिले. इकडे मॅटच्या निकालानंतर शेळकंदे यांनी सीईओ कुलदीप जंगम यांची भेट घेऊन पदावर हजर राहत असल्याचा अर्ज दिला. पण शेळकंदे यांनी मॅटच्या निकालाआधीच पदभार सोडल्यामुळे त्यांना पुन्हा पदभार देता येईल का? याबाबत सीईओ जंगम यांनी शासनाचे मार्गदर्शन मागितल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेळकंदे यांनी अद्याप पदभार घेतलेला नाही. विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्याने आचारसंहितेचा अंमल कधीही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामे मार्गी लावण्यासाठी बुधवारी अतिरिक्त पदभार असलेल्या स्मिता पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहून अनेक फाइली मार्गी लावल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून मार्गदर्शन आल्यानंतरच शेळकंदे यांच्या पदभारावर निर्णय होणार असल्याची प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. दरम्यान समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या रिक्त जागेवर जात पडताळणी समितीकडील कवले यांची नियुक्ती झाली आहे.