सोलापूर : माळशिरस नगरपंचायतीमधील कर निर्धारण अधिकारी विकास पवार याला दीड हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
यातील तक्रारदाराने बिनशेती केली होती. या बिनशेतीची नोंद करून मालमत्ता उतारा देण्यासाठी कर निर्धारण अधिकारी पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यावर पवार यांनी 2780 व काम करून देण्यासाठी पंधराशे रुपयाची लाच मागितली. त्यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. सोलापूर युनिटचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी माळशिरस नगरपंचायती कार्यालयावर सापळा लावून खातरजमा केली. त्यानंतर बुधवारी कार्यालयात तक्रारदाराकडून घरपट्टी व लाचेची रक्कम स्वीकारताना कर निर्धारण अधिकारी पवार याला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.