सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अंमल सुरु झाल्याने सोलापूर जिल्हा परिषदेच्या विकास कामाच्या प्रशासकीय मंजुरी देण्याच्या नोंदीचे रजिस्टर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सील केले आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेत विकास कामांच्या प्रशासकीय मंजुऱ्या देण्याचा विविध विभागाकडून धडाका सुरू होता. विकासकामाच्या मंजुऱ्या घेण्यासाठी ठेकेदार, सरपंच व आमदारांचे कार्यकर्ते हेलपाटे घालत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व विभागांना वेळेत विकास कामांच्या प्रशासकीय मंजुऱ्यांचे सोपस्कर पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. निवडणूक डोळ्यावर असल्याने आमदारांनी एक रुपयाही निधी सोडला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून होणाऱ्या रस्ते, गटार, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र दुरुस्ती, लघु पाटबंधारे विभागाकडून पाझर तलाव, बंधारे दुरुस्तीची कामे, समाज कल्याण विभागाकडून दलितवस्ती करावयाच्या कामावर भर देण्यात आला. या कामांच्या प्रशासकीय मंजुऱ्या वेळेत मिळाव्यात म्हणून आमदारांचा पाठपुरावा सुरू होता. अखेर विधानसभेचे निवडणूक जाहीर झाल्यावर आचारसंहितेचा अंमल सुरू झाला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आचारसंहितेचा तात्काळ अंमल करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. आचारसंहितेच्या काळात विकास कामांच्या प्रशासकीय मंजुऱ्या देण्यात येऊ नये यासाठी सीईओ जंगम यांना फायली क्लोज करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी सीईओ जंगम यांनी सर्व विभागाच्या विकास कामाच्या प्रशासकीय मंजुरीच्या फायलीवर सह्या करून प्रमा क्लोजड असा शेरा मारला. त्यामुळे जिल्हा परिषदेतील गर्दी आता कमी झाली आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहितेचा अंमल कडकपणे सुरू झाला आहे. राजकीय पक्ष व कार्यालयांना आचारसंहितेच्या पालनासाठी करावयाच्या बाबींचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी मदत देण्यात आली होती ती मुदत आता संपत आली आहे. त्यामुळे भरारी पथकामार्फत तपासणी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.