सोलापूर : कोजागिरी पौर्णिमिनिमित्त तुळजापूर पायी वारी करणाऱ्या देवी भक्तांसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सेवा दिली. तुळजापूररोडवरील कासेगाव फाटा येथे अपघात झालेल्या रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्र बोरामणी, आरोग्य टीमने तात्काळ प्रथमोपचार करून सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. याबद्दल आरोग्य विभागाच्या टीमचे कौतुक होत आहे.
अपघातग्रस्त देवी भक्तावर कासेगाव आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी सायली चांदेकर, आरोग्य सेविका चौगुले, आरोग्य सहाय्यक कोळी, बोरामणी आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक अभिजीत कुलकर्णी यांनी तात्काळ प्राथमिक उपचार करून संबंधित रुग्णाला शासकीय रुग्णालयाकडे हलवण्यास मदत केली.
कोजागिरी पौर्णिमेच्यानिमित्त तुळजापूर येथे पायी जाणाऱ्या भाविकांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोरामणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे रुग्णसेवा राबवली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलम घोगरे, डॉ. हिना बागवान यांच्या पथकाने गंगेवाडीफाटा येथे आरोग्य उपचार केंद्र स्थापन केले होते. या केंद्रात भाविकांसाठी मोफत उपचार करण्यात आले. या उपचार केंद्रात 15 हजार 867 रुग्णांना उपचार देण्यात आले. यासाठी विस्तार अधिकारी बी. के. चव्हाण, बिराजदार, राठोड, पर्यवेक्षक कोळी, दिपक कुलकर्णी, अभिजित कुलकर्णी, स्वामी, समुदाय आरोग्य अधिकारी अवताडे, चांदेकर, देशमुख, ताटे, बिराजदार आरोग्य सेविका चौगुले, बंडगर, रवळें, पाटील, रणखांबे, घाडगे, सलगरे, आरोग्य सेवक बिजापूरे, शिंदे, पडवळ, काळे, आडोळे, गायकवाड यांनी परिश्रम घेतले.