सोलापूर : जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी मोठा प्रतिसाद दिला. सर्व प्रस्ताव जरांगे- पाटील यांना सादर केले जाणार असून उद्या अंतरवली सराटी येथून मनोज जरांगे- पाटील सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मराठा उमेदवारची नावे जाहीर करणार आहेत.
मराठा आरक्षणाचे जनक मनोज जरांगे- पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील अनेक मराठा बांधवांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान मनोज जरागे- पाटील हे उद्या रविवारी दि.20 ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी येथून उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्यासाठी सर्व इच्छुक उद्या अंतरवली सराटीकडे सकाळी आठ वाजता रवाना होणार आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. दुसरीकडे विद्यमान सरकारने मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून झुलवत ठेवले. आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणावर निर्णय घेतला गेला नाही त्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे – पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडण्यासाठी विधानसभेला एकास एक उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातून अनेक उमेदवारांनी निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामध्ये माढा, बार्शी या विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात जास्त इच्छुक उमेदवार आहेत. माढ्यामधून माजी आमदार धनाजी साठे यांच्या सुनबाई माजी नगराध्यक्ष अॕड मीनल साठे, दिनेश गिड्डे, प्रियंका घाडगे, पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून देवानंद गुंड- पाटील., रामदास झोळ, उदयसिंह देशमुख, बार्शी विधानसभा मतदारसंघातून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर, शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजन जाधव, रवी मोहिते, नेताजी खंडागळे, दक्षिण सोलापुरातून महावीर बंडगर, मोहोळ विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदच्या समाज कल्याण माजी सभापती कल्पना क्षीरसागर यांचे पतीदेव राहुल क्षीरसागर शहर मध्य मतिन बागवान आदी 160 जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे.