सोलापूर : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे जिल्हा परिषदेत आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू असतानाच जिल्हा परिषदेच्या कामकाजाची पडताळणी करण्यासाठी पंचायतराज समिती दौऱ्यावर येत आहे.
यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 23 24 अंतर्गत पुणे विभागात सोलापूर जिल्हा परिषद प्रथम आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. पुणे विभागात या अभियानात पुरस्कार मिळालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती संस्थांची राज्यस्तरीय निवड समितीच्या वतीने पडताळणी करण्यासाठी कोकण विभागातील द्वि सदस्य समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेला भेट देऊन क्षेत्रीय पडताळणी करणार असल्याचे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी कळविले होते. पण या काळात हा दौरा झाला नाही. आता ही समिती 21 ऑक्टोबर रोजी दौऱ्यावर येणार आहे. या समितीमध्ये रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे व ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांचा समावेश आहे. ही समिती 21 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा परिषदेला भेट देऊन विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक आलेल्या कामांची पडताळणी करणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी व कर्मचारी आचारसंहितेच्या अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच गेल्या आठवड्यावर जिल्हा परिषदेतील वातावरण तापले होते. निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने विकास कामाची धावपळ अन ठेकेदार कर्मचारी यांच्यामध्ये झालेला गोंधळ, कर्मचारी,अभियंता व ठेकेदार संघटनेचे झालेल्या आंदोलनामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. अशात ही समिती दौऱ्यावर आल्यामुळे समितीच्या क्षेत्रीय भेटीच्या कार्यक्रमात अधिकारी व्यस्त झाले आहेत. अशा वातावरणात पंचायतराज अभियानात राज्यस्तरावर सोलापूर झेडपी चे नाव होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची कसोटी लागणार आहे.