सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाविकास आघाडीकडे जागा वाटपावरून अद्याप फायनल निर्णय झालेला दिसून येत नाही. ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण सोलापूरची जागा ठाकरे गटाला सुटले असून अमर पाटील यांना उमेदवारी निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे. या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देत पक्षाने एबी फॉर्म दिल्याचेही त्यांचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. तर इकडे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जागेसाठी आग्रह धरल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिणच्या जागेवर इच्छुक असलेले माजी आमदार दिलीप माने यांनीही आपण काँग्रेसची एकनिष्ठ असून दक्षिणची उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर इकडे ठाकरे गटाचे अमर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. अमर पाटील हे माजी आमदार रतिकांत पाटील यांचे चिरंजीव आहेत. रतीकांत पाटील हे दक्षिण सोलापुरात शिवसेनेचे आमदार होते तर अमर पाटील हे जिल्हा परिषद सदस्यही होते. त्यामुळे दक्षिण सोलापुरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. माजी आमदार दिलीप माने यांनी गेल्या वेळेस सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. यात त्यांना अपयश आले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा दक्षिण सोलापुरातून जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात आता ही जागा ठाकरे गटाला सुटल्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे. ठाकरे गटाला सुटली असली तरी प्रणिती शिंदे यांच्यावर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया दिलीप माने यांनी दिली आहे.