सोलापूर : शहर विधानसभा मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षेसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आर.पी. आय. (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे हे सक्षम पर्याय आहेत. त्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी देवेंद्र कोठे यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन विधानसभेत पाठवावे, असे आवाहन नागणसूर येथील श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी यांनी केले. सकल लिंगायत समाजातर्फे आयोजित मेळाव्यात उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
वालचंद महाविद्यालयाजवळील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्याप्रसंगी व्यासपीठावर उमेदवार देवेंद्र कोठे, कर्नाटकचे खासदार इरण्णा काडाडी, आमदार बसवण्णागौडा पाटील यतनाळ, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक सुरेश तमशेट्टी, माजी नगरसेवक भीमाशंकर बोळकोटे, माजी नगरसेवक डॉ. राजेश अनगिरे, सिध्दारुढ जवळकोटे, प्रा. भीमाशंकर बिराजदार, मल्लिनाथ करजगी, योगेश बसर्गी, महादेव बुरकुले, परमेश्वर कंचे, सुनील गौडगाव, सुरेश चिक्कली, सतीश तमशेट्टी, सिध्दारुढ हिटनल्ली, जगदीश नालवार उपस्थित होते.
श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी (नागणसुर) म्हणाले, सनातन धर्माच्या पाठीशी असणाऱ्या शहर मध्य मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना लिंगायत समाजाने एकजूट होऊन निवडून आणावे. यत्नाळचे आमदार बसवण्णा गौडा-पाटील म्हणाले, जो हिंदु हित की बात करेगा, वही शहर मध्य पे राज करेगा हे ब्रीदवाक्य सर्वांनी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी हिंदु मताचे विभाजन होऊ देणार नाही, असे ठरवले पाहिजे. हिंदु धर्मासाठी सर्वजण एकत्र येऊन भाजपा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून विधानसभेत पाठवावे.
खासदार इरण्णा काडाडी म्हणाले, केंद्रातील भाजपा सरकारने आणि राज्यातील महायुती सरकारने गरीब कल्याणकारी योजना, लाडकी बहिण योजना, उज्वला गॅससारख्या योजना राबवल्या. तसेच सोलापूरला जोडले गेलेले सर्व महामार्ग बनविले. सोलापूरमधील बंद असलेल्या विमानसेवेचे उद्घाटन करून एक महिन्यात विमानसेवाही सुरू होणार आहे. त्यामुळे विकासाची भूमिका घेऊन पुढे जाणारे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना भरघोस मताने विजयी करून द्यावे, असे आवाहनही खासदार इरण्णा काडाडी यांनी याप्रसंगी केले. यावेळी सोलापूर शहर मध्य मधील लिंगायत बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.