पढने, खेलने की उम्र है, बालविवाह जुर्म है, हत्तुरमध्ये चिमुकल्यानी दिला संदेश

सोलापूर : “पढने खेलने की उम्र है, बाल विवाह जुर्म है’ असा फलक हातात घेऊन बालविवाह विरोधात सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या चिमुकल्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कौतुक केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर येथे बाल विवाह मुक्त भारत अभियानअंतर्गत बाल विवाह होऊ नये यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून बालविवाह होऊ न देण्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर ठराव घेण्यात आला. तसेच बालविवाह न करण्याची शपथ गावातील सर्व उपस्थित ग्रामस्थांनी घेतली. प्रारंभी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी बालविवाह बाबतची पार्श्वभूमी सांगून त्या संबंधित कायद्याबाबतची माहिती देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बालविवाह संबंधित सविस्तर माहिती सांगून बालविवाह घडत असल्यास तो थांबवण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइन १०९८ तसेच महिला संरक्षणाकरता 181 हेल्पलाइनशी संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन केले. तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम सांगितले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे,गट विकास अधिकारी देसाई , बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी घोगरे,सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला, अंगणवाडी सेविका, आशा, पर्यवेक्षिका, किशोरी मुली, ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी जनजागरणासाठी रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी दोन चिमुकल्यांनी हाती घेतलेला फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.